बंद कंपनीच्या मालकीहक्काच्या वादातून सशस्त्र हल्ला, सुरक्षारक्षक ठार, तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:18 AM2019-05-03T00:18:39+5:302019-05-03T00:19:25+5:30

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये चार वर्षांपासून बंद पडलेल्या कंपनीच्या मालकीहक्कावरून दोन गटांत १ मे रोजी रात्री जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेत तलवार, चाकूने वार केल्याने कंपनीचा सुरक्षारक्षक ठार झाला.

Arms attack, security personnel killed and three injured in connection with the ownership of the closed company | बंद कंपनीच्या मालकीहक्काच्या वादातून सशस्त्र हल्ला, सुरक्षारक्षक ठार, तीन जण जखमी

बंद कंपनीच्या मालकीहक्काच्या वादातून सशस्त्र हल्ला, सुरक्षारक्षक ठार, तीन जण जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देचिकलठाणा ठाण्यात गुन्हा : शेंद्रा एमआयडीसीमध्ये १ मे रोजी रात्रीची घटना, जखमींवर रुग्णालयात उपचार

औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये चार वर्षांपासून बंद पडलेल्या कंपनीच्या मालकीहक्कावरून दोन गटांत १ मे रोजी रात्री जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेत तलवार, चाकूने वार केल्याने कंपनीचा सुरक्षारक्षक ठार झाला. मोठ्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षकाचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे वेगवेगळे गुन्हे नोंदविले.
रिजवान खान रशीद खान (३६, रा. टाऊन हॉल परिसर) या सुरक्षारक्षकाचा हल्ल्यात खून झाला. तर रिझवानचा लहान भाऊ मेहराज खान रशीद खान आणि हल्लेखोर खालेद अबू तुराब (४०, रा. रोशनगेट), आदिल खान नसीर खान (२५, रा. कटकटगेट), आवेश खान दोस्त मोहम्मद खान (२०, रा. टाऊन हॉल) हे जखमी झाले आहेत. अन्य आरोपी कैसर कुरेशी आणि माजीद हे किरकोळ जखमी झाले. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, शेंद्रा एमआयडीसीमधील नूर इंटरप्रायजेस ही बीफ कंपनी चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. या कंपनीच्या मालकीहक्कावरून अब्दुल गणी कुरेशी, साजीद कुरेशी आणि खालेद अबू तुराब यांच्यात वाद सुरू आहे. सध्या कंपनी गणी कुरेशी यांच्या ताब्यात आहे. रिजवान हे ९ वर्षांपासून कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. तर मेहराज खान ५ वर्षांपासून भावासोबत याच कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रिजवान कंपनीतच राहत होता. मेहराज रिजवान यांना जेवणाचा डबा पुरवीत असे. १ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोघे भाऊ कंपनीच्या गेटवर बसलेले होते. यावेळी आरोपी खालेद , आदिल खान, आवेश खान, कैसर कुरेशी आणि माजीद हे एका वाहनातून कंपनीत आले. रिजवान यांनी त्यांना कंपनीच्या बाहेर जा असे सांगितले. तुमचे जे काही म्हणणे आहे ते कंपनी मालकाला सांगा, असे म्हणाला. त्यामुळे आरोपींनी रिजवानला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि खालेदने अचानक रिजवानच्या पोटात चाकू खुपसला. रिजवानला वाचविण्यासाठी धावलेल्या मेहराजवर आरोपी कैसर कुरेशीने चाकूहल्ला केला. या घटनेत रिजवान जागीच ठार झाले. या घटनेनंतर आरोपी कंपनीतून पळून गेले.

 पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण

माहिती मिळताच गस्तीवरील चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक आसमान शिंदे, सहायक उपनिरीक्षक आबासाहेब देशमुख, हवालदार दिनकर थोरे, सुनील गोरे, सोपान डकले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तेथे पोहोचले तेव्हा हाणामारी सुरूच होती. यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांच्या हातातील धारदार चाकू पकडल्याने मेहराज खान यांचे प्राण वाचले. यानंतर जखमी मेहराज यांना पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात हलविले.

हल्लेखोरांपैकी तीन जण गंभीर जखमी
या घटनेत रिजवान आणि मेहराज यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी खालेद अबू तुराब, आवेस खान, आदिल खान हे रिजवान आणि मेहराज यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. याप्रकरणी जखमी आणि मृतांवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली.

आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचे आंदोलन
रिजवानचा खून झाल्याचे कळताच त्यांचे वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, तसेच आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी मेहुल आणि सपोनि. ताईतवाले यांनी नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. नातेवाईकांनी ३ वाजेपर्यंत आरोपींच्या अटकेसाठी मुदत देतो, असे सांगितले. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी २ आरोपींना ताब्यात घेतले. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केल्याचे आश्वासन दिल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
 

Web Title: Arms attack, security personnel killed and three injured in connection with the ownership of the closed company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.