एकमेकांची कोंडी करत सेना-भाजपाची स्वतंत्र चूल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 12:23 AM2016-11-13T00:23:28+5:302016-11-13T00:26:44+5:30
बीड जिल्ह्यातील सहाही पालिकांमध्ये युती करून निवडणुकीची समीकरणे बदलण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना आणि भाजपाने युती ऐवजी एकमेकांची कोंडी करण्याचेच राजकारण केले
प्रताप नलावडे बीड
जिल्ह्यातील सहाही पालिकांमध्ये युती करून निवडणुकीची समीकरणे बदलण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना आणि भाजपाने युती ऐवजी एकमेकांची कोंडी करण्याचेच राजकारण केले. त्यामुळे आता परळी वगळता इतर ठिकाणी युतीचे मनसुबे ठेवणारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होईल आणि ते विरोधकांसमोर आव्हान ठेवतील, अशी चर्चा अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रंगत होती. परंतु कोणती पालिका कोणाकडे या मुद्यावरची चर्चा शेवटपर्यंत संपलीच नाही. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे हे दोघे युतीच्या संदर्भात चर्चा करत होते. आता त्यांनीच एकमेकांवर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. सेनेचे जिल्हाध्यक्ष जगताप यांनी तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपाचा उमेदवार बीडमध्ये नगराध्यक्षपदासाठी देऊ नये, अशी सूचना करूनही पोकळे यांनी केवळ कोंडी करण्यासाठी भाजपाचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. युती फिसकटल्यामुळे मतविभाजनाचा धोका दोघांनाही होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये शिवसेनेने सुदर्शन धांडे यांना उमेदवारी दिली असून भाजपाचे सलीम जहाँगीर रिंगणात आहेत.
त्यामुळे शिवसेना आणि भाजपाने बीडसह धारूर, माजलगाव, गेवराई या ठिकाणी स्वतंत्र चूल मांडली आहे. परळीत भाजपा आणि शिवसेना एकत्र लढत असून सोबत रिपाइंही आहे भाजपाचे २३ उमेदवार तर सेनेचे सात उमेदवार आणि रिपाइंचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
धारूर आणि माजलगावमध्ये सेना आणि भाजपा यांची युती होण्याची शक्यता सुरूवातीला व्यक्त होत होती. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना झुलवत ठेवत अखेरच्या क्षणी दोघांनीही आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेत एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. माजलगाव आणि धारूर या दोन ठिकाणी जनविकास आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीसोबत भाजपा माजलगावात तर शिवसेना धारूरमध्ये असून आपले उमेदवार आघाडीच्या माध्यमातून दिले आहेत. माजलगावमध्ये शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी नितीन मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने आघाडीचे उमेदवार सहाल चाऊस यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. धारूरात सेना आघाडीसोबत असून नगराध्यक्षपदासाठी अमर महामुनी रिंगणात आहेत. भाजपाने याठिकाणी डॉ. स्वरूपसिंह हजारी यांना उमेदवारी देऊन स्वतंत्र उमेदवार दिला आहे.