सेनेचे ‘बी’ फॉर्म तयार!
By Admin | Published: September 25, 2014 12:55 AM2014-09-25T00:55:39+5:302014-09-25T00:56:29+5:30
विकास राऊत, औरंगाबाद शिवसेना-भाजपा युतीचे गणित किती जागांवर सुटणार यावरून अजून वरिष्ठ पातळीवर खल सुरू असला तरी शिवसेनेने मात्र, जिल्ह्यातील सर्व जागांसाठी ‘बी’ फॉर्म तयार ठेवले आहेत.
विकास राऊत, औरंगाबाद
शिवसेना-भाजपा युतीचे गणित किती जागांवर सुटणार यावरून अजून वरिष्ठ पातळीवर खल सुरू असला तरी शिवसेनेने मात्र, जिल्ह्यातील सर्व जागांसाठी ‘बी’ फॉर्म तयार ठेवले आहेत. २५ रोजी सकाळी ९ वा. ‘बी’ फॉर्म वाटप होणार आहेत. सेनेच्या वाट्याला आलेल्या ६ पैकी ५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश आले आहेत. युती झाल्यास पाच उमेदवार अर्ज दाखल करतील.
युती तुटल्यास सेनेने पूर्ण ९ जागांसाठी तयारी ठेवली आहे. शहरातील पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील जागांबाबत काही वाद नसल्यामुळे तेथील अर्ज २५ रोजी दाखल करण्यात येणार आहेत. उर्वरित चार जागांपैकी गंगापूर मतदारसंघाची अडचण असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
शहरातील मध्य, पश्चिम, वैजापूर, कन्नड, पैठण येथील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले आहे. उद्या २५ किंवा २६ रोजी उर्वरित उमेदवार अर्ज भरतील. आजवर मुखपत्रातून यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उमेदवार अर्ज दाखल करायचे. मात्र यावेळी त्या परंपरेला छेद देण्यात आला आहे. बंडखोरी होऊ नये, यासाठी ही सगळी उठाठेव करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
वैजापूरमधून आ. आर. एम. वाणी, पैठणमधून माजी आ.संदीपान भुमरे, कन्नडमधून आ. हर्षवर्धन जाधव, मध्य मतदारसंघातून आ.प्रदीप जैस्वाल तर पश्चिम मतदारसंघातून आ.संजय शिरसाट यांची नावे सध्या आहेत. या उमेदवारांची नावे निश्चित झाली अशी माहिती सेनेच्या गोटातून देण्यात आली आहे.
आ.जैस्वाल आणि आ.शिरसाट यांनी तर २५ रोजी उमेदवारी दाखल करणार असल्याचे जाहीर करून टाकले. आ.शिरसाट म्हणाले, आपल्यासमोर कुणाचेही आव्हान नाही. तर आ.जैस्वाल यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशाने अर्ज दाखल करणार असल्याचे कळविले आहे.