लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 07:44 PM2019-07-09T19:44:27+5:302019-07-09T19:52:39+5:30

जाधववाडी कृउबातील ७० टक्के उलाढाल मक्यावर अवलंबून 

Armyworm increases tension in farmers n market yard of Aurangabad | लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने वाढविली चिंता

लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने वाढविली चिंता

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते.

औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने जगात थैमान घातले आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातही मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात ४० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्याच्या अडत बाजारातील खरिपातील एकूण उलाढालीपेक्षा ७० टक्के उलाढाल मक्यावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर अडत व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

राज्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी ३ लाख ८५ हजार ते ४ लाख ३८ हजार हेक्टरवर कपाशी, तर १ लाख ३५ हजार ते १ लाख ८६ हजार हेक्टरदरम्यान मक्याची लागवड होते. कपाशीनंतर दोन नंबरचे पीक म्हणजे मका होय. या दोन पिकांवरच जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अवलंबून आहे. सततच्या दुष्काळामुळे मक्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने मक्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी मक्यावर अवलंबून असलेल्या जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथून देशातच नव्हे, तर विदेशात मका निर्यात होत असते. 

२००८-२००९ या वर्षी जाधववाडीतून रेल्वेचे ४५ रॅक (एका रॅकमध्ये ४५ हजार पोती) म्हणजे १८ लाख पोती मका मुंबईला पाठविण्यात आली होती. तेथून अमेरिकेलाही मका निर्यात झाली. त्यावेळेस अमेरिकेत मक्याचे उत्पादन घटले होते. ते वर्ष शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी चांगले राहिले होते. मात्र, मागील चार वर्षांत सतत मक्याची आवक घटत आहे. कृृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५-२०१६ या खरीप हंगामात १ लाख १२ हजार ८९१ क्विंटल मक्याची आवक झाली होती. त्यानंतर दुष्काळाने सतत मक्याची आवक घटत गेली.

मागील वर्षी २०१८-२०१९ मध्ये ३८ हजार ६०० क्विंटल मक्याची आवक झाली.  दुष्काळाचा मोठा फटका मका उत्पादनाला झाला होता. ई-नाम योजनेमुळे रोख रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी जालना अडत बाजारात मका विकली होती. त्याचाही मोठा फटका येथील अडत बाजाराला बसला होता. सध्या लष्करी अळीची चर्चा फक्त बांधावरच नव्हे, तर अडत बाजारातही होत आहे. व्यापारीही शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, मका पिकाची माहिती घेत आहेत. ४यंदा लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे १० हजार पोती मका तरी अडत बाजारात येईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे अडत्यांना व खरेदीदारांना परराज्यातील धान्य विक्री करून आपला व्यवसाय चालवावा लागणार आहे. 

कृउबात मागील ४ वर्षांतील मक्याची आवक  
वर्ष     आवक (क्विंटल)
२०१५-२०१६     १ लाख १२ हजार ८९१ 
२०१६-२०१७    १ लाख २१ हजार २१३
२०१७-२०१८    ६० हजार ८२५
२०१८-२०१९    ३८ हजार ६००

परपेठेतील माल विक्रीशिवाय नाही पर्याय 
जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य अडत बाजारात खरिपातील ७० टक्के उलाढाल केवळ मक्यावर अवलंबून असते. मात्र, सातत्याने मक्याच्या आवकमध्ये घट होत आहे. ई-नाम योजनेमुळे येथे शेतकऱ्यांना रोख रक्कम देता येत नाही. जिल्ह्यातील शेतकरी जालना कृउबात जाऊन मका विकत असल्याने त्याचाही मोठा फटका येथील आवकवर झाला आहे. यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मक्याचे ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होईल, असे सांगितले जात आहे. यामुळे आता परपेठेतील धान्य विक्री करण्याशिवाय येथील अडत्या व खरेदीदारांना पर्याय राहिला नाही.   
- कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना 

Web Title: Armyworm increases tension in farmers n market yard of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.