औरंगाबादेतील २ हजार होर्डिंग काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:08 AM2018-07-29T00:08:28+5:302018-07-29T00:09:31+5:30

महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून शहरात अवैध होर्डिंग हटविण्याची महास्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. १० तास चाललेल्या या मोहिमेत ९ वेगवेगळ्या पथकांच्या १६५ पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २ हजार ७८ लहान मोठे होर्डिंग काढले.

Around 2 thousand billboards were removed from Aurangabad | औरंगाबादेतील २ हजार होर्डिंग काढले

औरंगाबादेतील २ हजार होर्डिंग काढले

googlenewsNext
ठळक मुद्देशंभर टक्के काम न झाल्यास निलंबन; आयुक्तांची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून शहरात अवैध होर्डिंग हटविण्याची महास्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. १० तास चाललेल्या या मोहिमेत ९ वेगवेगळ्या पथकांच्या १६५ पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २ हजार ७८ लहान मोठे होर्डिंग काढले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये चमकोगिरी करणाºया भाऊ, दादांना या मोहिमेमुळे चाप बसला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही शहर स्वच्छतेची मोहीम सुरू राहणार आहे. ३१ जुलैपूर्वी शंभर टक्के होर्डिंग न काढणाºया वॉर्ड अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी घोषित केले.
पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महापालिकेचा अजिबात धाक नसल्याने आजपर्यंत कोणाच्या मनात आल्यावर रस्त्यावर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग लावण्यात येत असत. महापालिका एकाही अनधिकृत होर्डिंगवर राजकीय दबावापोटी कारवाई करीत नसल्याची परिस्थिती आहे. शहर विद्रुपीकरणाची दखल खंडपीठाने घेतली. खंडपीठाच्या आदेशानुसार संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घेतला. शनिवारी सकाळी ७ वाजेपासून संपूर्ण शहरात नऊ वेगवेगळ्या पथकांमार्फत कारवाईला सुरुवात करण्यात आली. एका पथकात १७ ते १८ अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक पथकात संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील मुख्य रस्त्यांवरील लहान-मोठे अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले. दिवसभरात २ हजार ७५ लहान मोठे होर्डिंग काढण्यात आले. पोलीस आणि मनपा यांच्या संयुक्त कारवाईमुळे प्रखर विरोध कुठेच झाला नाही. चार ते पाच ठिकाणी कारवाईनंतर नागरिकांनी विरोध दर्शविला. खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगितल्यावर नागरिकांनी शांत राहणे पसंत केले. रात्री उशिरा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सर्व वॉर्ड अधिकाºयांना बोलावून आढावा घेतला. ३१ जुलैपूर्वी प्रत्येक वॉर्ड अधिकाºयाने शंभर टक्के होर्डिंग न काढल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
खाजगी जागेवरही जाहिरीतीसाठी परवानगी आवश्यक
शहरात खाजगी जागेवर, इमारतींवर नागरिकांनी मोठमोठे होर्डिंग लावले आहेत. शनिवारी मनपाने कारवाईचा बडगा उगारताच मौलाना आझाद महाविद्यालयासमोर विरोध झाला. खाजगी जागेवरही जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर व्यापारी शांत झाले. जाधववाडी टी पॉइंट, आंबेडकरनगर, बीड बायपास रोडवर पटेल लॉन्स येथे कारवाईला विरोध झाला. महापालिका अधिनियम १९४९, मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ नुसार खाजगी जागेवरही जाहिरात फलक लावायचा असेल तर मनपाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे उपायुक्त मंजूषा मुथा यांनी सांगितले.

नागरिक, व्यापारी, कार्यकर्त्यांचा रोष
महापालिकेच्या सर्वच पथकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत होर्डिंग दिसताच काढण्याची कारवाई करीत होते. खाजगी जागेवरील असंख्य फलक काढण्यात आले. त्यामुळे नागरिक, व्यापारी, कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शहरातील कचरा प्रश्नाला बगल देण्यासाठी महापालिका असे उपक्रम राबवीत आहे. खाजगी जागेवरील फलक काढण्याचे अधिकार मनपाला नाहीत आदी असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
शहरात दहा हजार अनधिकृत होर्डिंग
महापालिका अधिकाºयांच्याच सर्वेक्षणानुसार शहरातील ११५ वॉर्डांमध्ये किमान दहा हजार अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स असतील, असा अंदाज आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दोन हजार होर्डिंग काढण्यात आले. आणखी आठ हजार होर्डिंग काढणे बाकी आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशीही पथक काम करणार आहेत. मंगळवार ३१ जुलैपर्यंत शहर चकाचक करण्याचा मनोदय मनपा आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गुन्हा दाखल करण्याची वेळ आली नाही...
बीड बायपास रोडवर पटेल लॉन येथे झोन क्र. ८ च्या पथकाला विरोध करण्यात आला. अनेकदा समजूत घातल्यानंतरही व्यापारी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलीस आणि मनपाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र व्यापाºयांनी नमते घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
पथकांनी अशी केली कारवाई
सकाळी ६ वाजता महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये पथक वाहनांसह सज्ज ठेवण्यात आले होते. ७ वाजता पथक कारवाईसाठी बाहेर पडले. शहरातील मुख्य डी. पी. रोडवरील पोस्टर्स, बॅनर्स काढण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी १० वाजेपर्यंत वाहनांची, नागरिकांची फारशी वर्दळ नसल्याने कारवाईला वेग आला होता.
दुभाजकांच्या पोलवरील होर्डिंग काढण्यात सर्वाधिक त्रास होत होता. झोन क्र.४ मधील पथकाने जळगाव टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट, हर्सूल गावात जाऊन कारवाई केली. परत लेबर कॉलनी, सुभेदारीपर्यंत कारवाई केली.
त्याचप्रमाणे झोन क्र. ६ मधील पथकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून मोहिमेला सुरुवात केली. चिकलठाणा गाव येथे कारवाई करून परत रामनगर, विठ्ठलनगर, जयभवानीनगर भागात कारवाई केली. झोन क्र. ७ च्या पथकाने सिडको बसस्थानक ते एन-१, सेव्हन हिल ते मध्यवर्ती जकातनाका, गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी चौक, शिवाजीनगर रेल्वेपटरी, बायपास, शहानूरमियाँ दर्गा, रोपळेकर रोडपासून परत वॉर्ड कार्यालयापर्यंत कारवाई केली.

Web Title: Around 2 thousand billboards were removed from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.