छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपास झपाट्याने प्लॉटिंग; ५९ टक्के शेतीच्या जागेवर घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 04:24 PM2024-12-05T16:24:16+5:302024-12-05T16:27:03+5:30
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत एक सर्वेक्षण; यूएनडीपी, महापालिका, स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहराच्या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात अहवाल तयार करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या आसपास असलेल्या शेतीवर झपाट्याने प्लॉटिंग टाकण्यात येत आहे. ५९ टक्के शेतीच्या जमिनीवर घरे बांधण्यात येत असल्याचे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) अंतर्गत शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत काम करणारे अधिकारी डॉ. मुरलीकृष्णा रेड्डी यांनी नमूद केले. बुधवारी एका कार्यशाळेत त्यांनी विविध बाबींचा तपशील मांडला.
यूएनडीपी, महापालिका, स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहराच्या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात अहवाल तयार करण्यात येत आहे. या अहवालात शहराच्या जमेच्या बाजू कोणत्या आणि भविष्यात कोणत्या नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीला तोंड द्यावे लागू शकते, याचा अभ्यास करण्यात येतोय. शहराचे क्षेत्रफळ १७८ स्क्वेअर किमीपर्यंत पोहोचले असून, कमकुवत इमारती भविष्यात त्रासदायक ठरतील. शहराला भूकंपाचा धोका अत्यंत कमी आहे. मात्र, पर्यावरणीय दृष्टीने उष्णता झपाट्याने वाढत आहे. शहरी भागात वृक्षांचे प्रमाण वाढविणे, टेरेस गार्डन इ. उपक्रम राबवावे लागतील. औद्योगिक क्षेत्रात केमिकल, ज्वलनशील पदार्थांचा वापर करणाऱ्या कंपन्या शहरापासून लांब असायला हव्यात. २०२३ मध्ये शहरात आगीच्या ४६५ घटना घडल्या. त्यातील ७० टक्के घटना या फक्त शॉर्टसर्किटमुळे होत्या. या घटना टाळता येणे शक्य आहे. पण महापालिकेचा अग्निशमन विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही.
वादळी वारे जेव्हा वाहू लागतात तेव्हा मोठमोठ्या होर्डिंगला धोका असतो. त्याचे नियमित ऑडिट झाले पाहिजे. शहरात ऐन सणासुदीत वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे एखादा मोठा कार्यक्रम असेल तरीही वाहतुकीची अवस्था बिकट होते. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत रेड्डी यांनी व्यक्त केले. एलपीजी, रसायनांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ काम देण्यात येऊ नये, असे ते म्हणाले.
अहवालात प्रशासकांच्या अपेक्षा
कार्यशाळेचा समारोप करताना मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. अहवालात रुग्णालये कुठे आहेत, स्पेशल तज्ज्ञ डॉक्टर कुठे आहेत, हे नमूद असावे. २०२८ नंतर शहर झपाट्याने वाढणार आहे. त्या दृष्टीने नैसर्गिक आपत्तीसंदर्भात नागरिकांनाही प्रशिक्षण असायला हवे. नाल्यांच्या आसपास असलेली अतिक्रमणेही भविष्यात त्रासदायक ठरू शकतात, असे ते म्हणाले.