दिवसभर औरंगाबादचे आकाश पतंगमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:26 PM2018-01-14T23:26:08+5:302018-01-14T23:26:14+5:30
‘तम्मा तम्मा लोगे’पासून ते ‘झिंग,झिंग झिंगाट’पर्यंतची गाणी डीजेवर वाजत होती... या गाण्यांच्या धुंदीत ‘ए ढील दे रे ढील दे... अरे खिच, खिच, जोरसे खिच... काटे,काटे....असे शब्द रविवारी दिवसभर शहरात ऐकण्यास मिळत होते... उंच इमारतींच्या गच्ची-गच्चीवर आबालवृद्ध पतंगबाजीत रमले होते. एकाच वेळेस हजारो पतंग उडत असल्याने आकाश रंगीबेरंगी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘तम्मा तम्मा लोगे’पासून ते ‘झिंग,झिंग झिंगाट’पर्यंतची गाणी डीजेवर वाजत होती... या गाण्यांच्या धुंदीत ‘ए ढील दे रे ढील दे... अरे खिच, खिच, जोरसे खिच... काटे,काटे....असे शब्द रविवारी दिवसभर शहरात ऐकण्यास मिळत होते... उंच इमारतींच्या गच्ची-गच्चीवर आबालवृद्ध पतंगबाजीत रमले होते. एकाच वेळेस हजारो पतंग उडत असल्याने आकाश रंगीबेरंगी झाले होते.
संक्रांतीचा दिवस म्हणजे पतंगबाजांसाठी पर्वणीच असते. दैनंदिन सर्व कामे बाजूला सारून ‘संक्रांत का दिन पतंग के नाम’ करण्यात येतो. याची प्रचीती आज पुन्हा आली. विशेषत: जुन्या शहरात पतंगबाजीचा उदंड उत्साह दिसून आला. उंच इमारतींवरील गच्चीवर आबालवृद्ध पतंग उडविताना दिसून आले. सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागलेले होते. एक साथ आकाशात रंगीबेरंगी हजारो पतंग उडत होते. त्यातून एकमेकांचे पतंग काटण्याची अटीतटीची स्पर्धा सुरूहोती. कोण सर्वाधिक पतंग काटतो, अशी स्पर्धाच सुरू होती. बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण पतंगबाजीत रमले होते. औरंगपुरा, गुलमंडी, कुंभारवाडा, दिवाणदेवडी, पानदरिबा, अंगुरीबाग, कासारीबाजार, भांडीबाजार, सराफा रोड, शहागंज, धावणी मोहल्ला, राजाबाजार, खाराकुंवा, किराणा चावडी, मोंढा आदी भागांत पतंगबाजीला उधाण आले होते. विरोधी पार्टीचा पतंग कटल्यावर ‘काटे’ असे जोरात ओरडून आनंद व्यक्त केला जात होता.
तरुणी पतंग उडविण्यात अग्रेसर
गोमटेश मार्केटच्या बाजूच्या सिंगापूर कॉम्प्लेक्सच्या गच्चीवरून सर्व शहराचा नजारा दृष्टिक्षेपात पडत होता. येथेही मोठ्या संख्येने तरुणीही पतंग उडविण्याचा आनंद घेत होत्या.
पक्षभेद विसरून नेत्यांची एकत्रित पतंगबाजी
एरव्ही छोट्या-छोट्या कारणांवरून वादविवाद करून त्याचे पक्षहितासाठी भांडवल करणाºया शिवसेना-भाजपचे नेते मात्र, आज संक्रांतीनिमित्त एकत्र आले होते. सिंगापूर कॉम्प्लेक्सच्या गच्चीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या वतीने आयोजित पतंगबाजी सोहळ्यात सर्व नेते पतंग उडविण्यात रमले होते. आ. अतुल सावे, माजी खा. प्रदीप जैस्वाल, भागवत कराड, शिरीष बोराळकर, बस्वराज मंगरुळे, गोपी घोडेले, राजू तनवाणी, यांच्यासह अन्य नेते, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, सामाजिक अधिकारी, पत्रकारांनी येथे पतंग उडविण्याचा आनंद लुटला. प्रदीप जैस्वाल जेव्हा पतंग उडवीत होते, तर तनवाणी यांनी चक्री धरली होती. जैस्वाल यांनी एक पतंग काटला पण दुसºया पेचमध्ये त्यांचा पतंग कटला. तेव्हा तनवाणी यांनी ज्या गतीने मांजा गुंडाळला ते पाहण्यासारखे होते.