नवीन जलवाहिन्या टाका अन्यथा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:33 AM2018-09-03T01:33:36+5:302018-09-03T01:34:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या बदलण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला आहे. कोट्यवधी रुपयांची ही कामे करण्यासाठी प्रशासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे हा पर्याय नसल्याचे मत प्रशासनाने नोंदविले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर नगरसेवक थेट राजीनामा देण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या संकटात भर पडली आहे.
नवीन धोरणातील निकष असे
जिथे जलवाहिनी बदलायची आहे, तिथे किती दिवसाआड पाणी दिल्या जाते, प्रती माणशी किती पाणी मिळते.
नवीन जलवाहिनी टाकल्यावर त्या भागातील उपलब्ध पाण्यावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे.
जलवाहिनी टाकल्यावर किती क्षेत्रात, किती प्रमाणात आणि कधीपासून पाणी उपलब्ध होईल.
प्रस्तावित जलवाहिनीच्या वसाहतीत पाण्याचे सध्या स्रोत काय, त्याचे प्रमाण किती.
दूषित पाणीपुरवठ्याची कारणे द्या. नंतर किती फरक पडेल हेसुद्धा नमूद करा.
पाणीपुरवठा विभागाच्या अहवालास तांत्रिक आधार काय, कोणती चाचणी करण्यात आली.
जिथे जलवाहिनी टाकायची आहे, तिथे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण किती आहे.
नवीन जलवाहिनी टाकणाऱ्या भागात अवैध नळ किती, नळाला मोटारी किती आहेत.
सद्य:स्थितीत असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून दूषित पाण्याचा प्रश्न का सोडविता येत नाही.
जलवाहिनी बदलण्याची संचिका तयार करताना या सर्व निकषांचा आधार घ्यावा.