पैसे देऊन लग्न जुळवले; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:24 AM2024-04-12T11:24:18+5:302024-04-12T11:25:03+5:30
बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
वैजापूर, शिऊर : लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी अंगावरील दागिन्यांसह नवरीने धूम ठाेकल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मनूर येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी नवरीसह लग्न लावून देणाऱ्या बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवरी नंदिनी राजू गायकवाड (रा. गांधीनगर, अकोट फैल, जि. अकोला), अनिल दिगंबर जोशी (रा. जवळी खुर्द, ता. कन्नड), मनीषा गजानन मानवते(रा. खामगाव, जि. बुलढाणा), पूजा विजय माने (रा. महाडीकवाडी, लिंगीवरे, जि. सांगली), रणजित (रा. हिंगोली, पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार मनूर येथील अंबादास विश्वनाथ दवंगे (वय २९ वर्षे) हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत होता. परंतु त्याला मुलगी मिळत नव्हती. दरम्यान, नात्यामधील एका व्यक्तीने लग्न जुळवून देणाऱ्या रणजित नामक व्यक्तीशी अंबादास याचा संपर्क करून दिला. योग्य मुलगी मिळेल, परंतु त्यासाठी १ लाख ८१ हजार रुपये लागतील, असे रणजितने सांगितल्यानंतर अंबादासने होकार दिला. त्यानंतर दलालानेही नंदिनीची अंबादाससोबत भेट घालून दिली. १० एप्रिल रोजी दुपारी मनूर येथील एका मंदिरात या दोघांचा विवाहही पार पडला. लग्न लागताच रणजितने ठरलेली रक्कम अंबादासकडून घेऊन तो त्या सहकाऱ्यांसोबत तेथून निघून गेला.
मोटारसायकलवरून नवरी मध्यरात्री झाली गायब
याच दिवशी रात्री नवरदेव अंबादास घराच्या छतावर तर नववधू अंबादासची मावशी व इतर नातेवाईक महिलांसोबत घरात झोपली होती. दरम्यान, नवरी घरात नसल्याची ओरड मध्यरात्री सुरू झाली. गुरुवारी सकाळी नंदिनी अंगावरील दागिन्यांसह एका अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून निघून गेल्याचे तरुणाला समजले. याप्रकरणी दुपारी अंबादासने शिऊर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबिती कथन केली. त्यानुसार पोलिसांनी त्या सहा आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.