दारू पिऊन अधिकाऱ्यांना केलेली अरेरावी भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:04 AM2021-06-03T04:04:42+5:302021-06-03T04:04:42+5:30
वैजापूर : तपासणीत अनेक त्रुटींसह धान्याचा साठा कमी आढळल्याने पानवी बुद्रुक (ता.वैजापूर) येथील स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हा दाखल करा, ...
वैजापूर : तपासणीत अनेक त्रुटींसह धान्याचा साठा कमी आढळल्याने पानवी बुद्रुक (ता.वैजापूर) येथील स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश तहसीलदार राहुल गायकवाड यांनी पुरवठा निरीक्षकांना दिले आहेत. या दरम्यान दुकानदारांच्या पतीने तपासणी पथकातील अधिकाऱ्यास दारू पिऊन अरेरावी केली होती, असा उल्लेख पंचनाम्यात आहे. विविध नियमांकडे दुर्लक्ष, तसेच गैरवर्तन केल्यामुळे संबंधितांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
आठ दिवसांपूर्वी गंगापूर तालुक्यात शासकीय धान्य काळ्या बाजारात घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांना आढळून मिळून आला होता. हे धान्य वैजापूर तालुक्यातील पानवी बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानदाराचे असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे या दुकानाची महसूलच्या पथकाने तपासणी केली. या दरम्यान या महिला दुकानदाराचे पती दुकान चालवत असल्याचे पथकाला दिसून आले. तपासणीच्या वेळी दुकानदाराचे पती यांनी दारू पिऊन अधिकाऱ्यांशी अरेरावी केली, असे पुरवठा निरीक्षक कैलास बहुरे यांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे. वैजापूर तालुक्यातील पानवी बुद्रुक येथे के.आर. बाहेती यांच्या नावावर स्वस्त धान्य दुकान असून, पुरवठा निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत दुकानात अनेक त्रुटी आढळून आल्या.
या तपासणीत दुकानात पाच क्विंटल सहा किलो गहू आणि तांदूळ सहा क्विंटल ७२ किलो कमी आढळून आला. भाव फलक, दक्षता समिती फलक, साठा फलक, व्हिजिट बुक, तक्रार पुस्तिका, लाभार्थ्यांच्या याद्या नसल्याने तपासणी अधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी दुकानदाराचा पती दारूच्या नशेत होता. ही सर्व कामे तुमची आहेत, तुम्हाला काही अधिकार नाही, असे म्हणाला. त्यानंतर, अधिकाऱ्याने दुकानातील पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील धान्याचा साठा तपासला. दुकानात इलेक्ट्रॉनिक काट्याऐवजी तराजू होता, तसेच महिन्यातून केवळ दोन ते तीन दिवस दुकान सुरू असल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे, तपासणी अधिकाऱ्यांसमोर दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यास नकार दिला, असा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला. या आधारे संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले.