अंधारात पादचाऱ्याला उडवून पसार झालेल्या दुचाकीचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:04 AM2021-06-26T04:04:32+5:302021-06-26T04:04:32+5:30
औरंगाबाद: रात्रीच्या अंधारात एका पादचाऱ्याला जोराची धडक देऊन पळून गेलेल्या दुचाकीचालकाचा शोध घेण्यात जिन्सी पोलिसांना शुक्रवारी यश आले. १४ ...
औरंगाबाद: रात्रीच्या अंधारात एका पादचाऱ्याला जोराची धडक देऊन पळून गेलेल्या दुचाकीचालकाचा शोध घेण्यात जिन्सी पोलिसांना शुक्रवारी यश आले. १४ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आझाद चौकात हा अपघात झाला होता. शेख अनस शेख उस्मान (२०, रा. शाहनूरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता.
जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले की, तेजस महादेव सिरसाठ (४०, रा. एकतानगर, जटवाडा रोड) यांना उडवले. यानंतर त्यांना उडविणारा वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला होता. या अपघातानंतर तेजस यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तेजस यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. पोलीस उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळापासून बळीराम पाटील शाळेपर्यंत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमे-याच्या फुटेजची तपासणी केली. मात्र संशयित दोन वाहनांचा क्रमांकाच्या आधारे वाहनमालकांचा शोध घेतला. तेव्हा एका जणाने त्यांची दुचाकी दोन महिन्यांपूर्वी नातेवाईक अनस शेखला विकल्याचे सांगितले. यानंतर त्या अनसचा शोध घेतला आणि या घटनेविषयी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अपघाताची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक केली.
चौकट...
दुचाकीचालकही झाला होता जखमी
तेजस सिरसाठ यांना उडविल्यामुळे झालेल्या घटनेत दुचाकीचालक अनस हा घसरला होता. या अपघातात त्यालाही मार लागला होता. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी त्याने एका रुग्णालयात जाऊन उपचार घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले.