साप्ताहिकाच्या संपादक व पत्रकारास खंडणी घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 07:34 PM2019-05-22T19:34:34+5:302019-05-22T19:37:20+5:30
बातमी साप्ताहिकामध्ये छापून तुमची बदनामी करतो, अशी धमकी देत खंडणीची मागणी
औरंगाबाद : कुंभेफळ येथील लोककला केंद्रचालकास साप्ताहिकात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देत २ लाख रुपयांची खंडणी मागणाºया साप्ताहिकाच्या पत्रकारासह त्याच्या साथीदारास सिडको पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई मंगळवारी (दि.२१) सकाळी सिडको, एन-११ भागात एका हॉटेलजवळ करण्यात आली.
शरद भीमराव दाभाडे (४२, रा. हडको एन-१२, स्वामी विवेकानंद गार्डनजवळ), असे खंडणीबहाद्दर पत्रकाराचे नाव असून, विजय रामभाऊ जाधव (५८, रा. एन-१३, सिडको) हा त्याचा साथीदार आहे. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिलेल्या माहितीवरून बाबासाहेब किसनराव गोजे (५६, रा. कुंभेफळ, ता. औरंगाबाद) यांचे कुंभेफळ येथे साई लोकनाट्य कलामंदिर नावाने कला केंद्र आहे.
शरद दाभाडे, विजय जाधव यांनी बाबासाहेब गोजे यांना तुमच्या कलाकेंद्रात अवैध धंदे चालत असून, त्याची बातमी आमच्या साप्ताहिकामध्ये छापून तुमची बदनामी करतो, तसेच तुमचे कला केंद्र कायमचे बंद करून टाकेन, अशी धमकी दिली होती. कला केंद्र सुरू ठेवायचे असेल, तर आम्हाला २ लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून सतत खंडणीची मागणी करीत होते. या त्रासाला कंटाळलेल्या बाबासाहेब गोजे यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
गोजे यांची तक्रार प्राप्त होताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, किशोर गाढे, विजय भानुसे यांच्या पथकाने एन-११ हडको परिसरातील हॉटेल कृष्णा फास्ट फूडजवळ सापळा रचून शरद दाभाडे, विजय जाधव यांना अटक केली. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी कार (एमएच-२० डीजे-७१२१) आणि रोख ३० हजार रुपये जप्त केले आहेत.