राजेंद्र जैनकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:08 AM2019-07-09T00:08:56+5:302019-07-09T17:12:56+5:30
आरोपी राजेंद्र जैनकडून अल्पदरात चोरीचे सोने खरेदी केल्याच्या संशयावरून शहरातील एका सराफाला विशेष तपास पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली.
औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्समधून कोट्यवधी रुपये किमतीच्या सुवर्णालंकाराची हेराफेरी करणारा आरोपी राजेंद्र जैनकडून अल्पदरात चोरीचे सोने खरेदी केल्याच्या संशयावरून शहरातील एका सराफाला विशेष तपास पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली. सुवर्णालंकार हेराफेरीतील ही चौथी अटक आहे.
राजेश ऊर्फ राजू सेठिया (५०, रा. उस्मानपुरा) असे सराफाचे नाव आहे. सेठिया याचे सराफ्यात जडगाववाला ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. विशेष तपास पथकाचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले की, राजेंद्र जैनच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी वाढली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने काही किलो सोन्याचे दागिने जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेश सेठियाला विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस जैनला घेऊन सेठियाच्या दुकानात गेले. तेथे त्याने सोने घेणारा राजेश सेठिया हाच असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी राजेश सेठियाला ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत नेले. तेथे रात्री उशिरापर्यंत सेठियाची चौकशी वरिष्ठ अधिकारी करीत होते.
२२ हजार रुपये प्रतितोळा दराने घेतले सोने
राजेश सेठियाने राजेंद्र जैनकडून २२ हजार रुपये प्रतितोळा याप्रमाणे सोन्याचे दागिने खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुमारे ३० किलो दागिने सेठियाला दिल्याचे राजेंद्र जैनने पोलिसांना सांगितले. सेठिया मात्र आपण राजेंद्र जैनकडून दागिने खरेदी केलेच नसल्याचे पोलिसांना सांगत होता. सेठिया पोलिसांनाही उडावाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी संशयावरून सेठियाला अटक केली.