महिलांवर सामूहिक अत्याचार प्रकरणी एका संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:55 AM2021-10-22T10:55:00+5:302021-10-22T10:55:13+5:30
रात्रभर कोंबिंग ऑपरेशन : संदीपान भुमरे यांनी घेतली पीडितांची भेट
औरंगाबाद : राज्याला हादरवून सोडणाऱ्या पैठण तालुक्यातील तोंडोळीच्या शेतवस्तीवरील महिलांवर सामूहिक अत्याचार आणि दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी गुुरुवारी रात्री उशिरा एका संशयिताला अटक केली. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या आठ साथीदारांचा शोध घेण्यासाठी सहा पथके रवाना करण्यात आली आहेत.
गुरुवारी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन करून मदतीचे आश्वासन दिले. तोंडोळी भागातील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून एक परप्रांतीय कुटुंब राहण्यास आले होते. मंगळवारी रात्री सात ते आठ दरोडेखोरांनी या कुटुंबावर हल्ला करून दोन महिलांवर चाैघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती.
घटनेच्या दुसऱ्या दिवशीही पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल, स्थानिक गुन्हे शाखेेचे संतोष खेतमाळस यांनी बिडकीन परिसरात ठाण मांडले होते. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केले.
सर्वतोपरी मदत करणार : भुमरे
पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, पीडित कुटुंबाला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सर्वतोपरी मदत करणार आहे. या घटनेतील आरोपींना लवकरच पोलीसही अटक करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात मोगलाई : वाघ
राज्यात महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. सरकारचे अस्तित्व राहिले नसून, मोगलाई अवतरली असल्याची टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
शुक्रवारी सकाळपर्यंत गुन्ह्याची पूर्णपणे उकल होईल, असा विश्वास आहे. औरंगाबाद पोलीस ग्रामीण दलातील प्रत्येकजण आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण