किरकोळ कारणातून मित्राच्या डोक्यात रॉड मारला, रक्तस्त्रावाने मृत्यू; आरोपी निफाड येथून ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 07:37 PM2023-03-20T19:37:09+5:302023-03-20T19:37:59+5:30

रॉड मारल्यानंतर मित्र घरातून पसार झाला; रात्रभर रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू

Arrested for murdering a friend with a rod on his head over a dispute over a minor reason | किरकोळ कारणातून मित्राच्या डोक्यात रॉड मारला, रक्तस्त्रावाने मृत्यू; आरोपी निफाड येथून ताब्यात

किरकोळ कारणातून मित्राच्या डोक्यात रॉड मारला, रक्तस्त्रावाने मृत्यू; आरोपी निफाड येथून ताब्यात

googlenewsNext

गंगापूर: किरकोळ कारणातून वाद झाल्याने मित्राचा खून करणारा आरोपी नवनाथ खैरे (३५, रा.गंगापूर ) यास पोलिसांनी नासिक जिल्ह्यातील निफाड येथून रविवारी (१९) रोजी रात्री उशिरा ताब्यात घेतले. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेला योगेश शंकरराव भालेकर (३९, रा.समतानगर )  याचा उपचारादरम्यान आज (दि.२०) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. 

याविषयी अधिक माहिती अशी की योगेश भालेकर हे पत्नी व मुलासह समतानगर येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नी मुलासह माहेरी गेलेल्या असल्याने ते घरी एकटेच होते. शुक्रवारी (१७) रोजी रात्री ते आपला मित्र आरोपी नवनाथ खैरे याच्यासह घरी आले होते. साडेआठ वाजेच्या सुमारास काहीतरी वाद झाल्याने नवनाथ याने योगेशच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी योगेश रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होता. 

शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास योगेश यांची आई त्यांच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आल्या असता त्यांना योगेश जखमी अवस्थेत आढळून आला. त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देऊन रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ याच्या मदतीने जखमी योगेश यास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्रभर रक्तस्राव झाल्याने व वेळेवर उपचार न मिळाल्याने योगेश याची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविले. 

दरम्यान, जखमी योगेश भालेकर याचा भाऊ सचिन भालेकर यांनी गंगापूर पोलिसात रविवारी (१९) रोजी दुपारी नवनाथ खैरे विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्याने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्या पासून आरोपी नवनाथ फरार असल्याने सहपोनि अशोक चौरे, बलविर बहुरे, पदमकुमार जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी नवनाथ खैरे यास निफाड येथून रविवारी उशिरा अटक केली. इकडे, घाटी रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार घेत असलेल्या योगेशचा आज पहाटे मृत्यू झाला. प्रकरणाचा अधिक तपास सपोनि अशोक चौरे हे करीत आहेत. योगेश यांच्यावर येथील स्मशानभूमीत सोमवारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Arrested for murdering a friend with a rod on his head over a dispute over a minor reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.