लग्न मोडण्यासाठी हॉटेलवर गोळीबार प्रकरणातील एका संशयित आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 07:48 PM2021-04-29T19:48:52+5:302021-04-29T19:49:13+5:30
३० मार्चच्या रात्री मिटमिटा येथे दोघांनी हॉटेलवर दोन गोळ्या झाडल्या आणि धमकीपत्र फेकले होते.
औरंगाबाद : आपणास नाकारणाऱ्या मुलीसोबत लग्न जुळविणाऱ्या तरुणाच्या हॉटेलवर गोळीबार करून लग्न मोडण्याचे धमकीपत्र फेकल्याची घटना गेल्या महिन्यात मिटमिटा परिसरात घडली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून एका संशयिताला अटक करून आणले. राहुल सुखदेव गायकवाड (२१, रा. कोखडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित विशाल मनोहर गाडिलकर याचा शोध पोलीस घेत आहेत. विशालने साथीदारांसह ३० मार्चच्या रात्री मिटमिटा येथे येऊन मनीषच्या हॉटेलवर दोन गोळ्या झाडल्या आणि धमकीपत्र फेकले होते. संशयित आरोपी घटनेपासून फरार होते. या गुन्ह्याचा तपास करताना विशालसोबत राहुल गायकवाड होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. राहुल हा अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांना खंडणीच्या गुन्ह्यात वॉण्टेड होता. औरंगाबाद पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधारे त्याला शोधून काढले. तो फरार होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर पोलिसांना त्याला पकडण्याचे सांगितले. तो अनेक दिवसांपासून चकमा देत असल्यामुळे त्याला पकडताच नगर पोलिसांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे समजताच छावणी पोलिसांच्या पथकाने पारनेर न्यायालयाच्या परवानगीने त्याला ताब्यात घेतले आणि औरंगाबादला आणले, असे सहायक पोलीस निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
मिटमिटा येथील हॉटेल व्यावसायिक मनीष किसन गायकवाड यांचा विवाह ज्या तरुणीसोबत ठरला होता. त्या नियोजित वधूने आरोपी विशालला लग्नासाठी नाकारले होते. याचा राग विशालला आला होता. आरोपी विशाल हा मनीषच्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. यामुळे ते परस्परांना ओळखतात. तिचे मनीषसोबत लग्न होऊ नये असे यासाठी विशालने अनेक प्रयत्न चालविले होते. मनीषच्या वडिलांच्या मोबाइलवर मेसेज पाठवून आणि फोन करून त्याने हे लग्न रद्द करण्याची धमकीही दिली होती. मात्र गायकवाड कुटुंबाने त्याच्या धमक्यांना भीक न घालता लग्नाची तारीख काढली होती. त्यामुळे विशालने उपरोक्त गुन्हा केल्याचा संशय आहे.