महिला, मुलींची छेड काढणा-या उपद्रवी भावांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 06:38 PM2017-09-24T18:38:34+5:302017-09-24T18:38:45+5:30
सिडको एन-६ मधील मथुरानगरात राहणा-या एका गल्लीतील महिला आणि मुलींची सारखी छेड काढून त्यांचे जगणे मुश्कील करणा-या दोन भावांना सिडको पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली.
औरंगाबाद, दि. २४ : सिडको एन-६ मधील मथुरानगरात राहणा-या एका गल्लीतील महिला आणि मुलींची सारखी छेड काढून त्यांचे जगणे मुश्कील करणा-या दोन भावांना सिडको पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. विशेष म्हणजे २३ सप्टेंबर रोजीच यातील एकजण छेडछाडीच्या गुन्ह्यातून जामीनवर सुटला होता. लॉकमधून बाहेर आल्यानंतर त्याने गल्लीत दहशत निर्माण करून घराच्या खिडकीच्या काचा फोडणे, दुचाकी फोड करून तक्रारदारांना मारहाण केली.
बाळू उर्फ देवेंद्र उर्फ गणेश पैठणे आणि सतीश पैठणे अशी आरोपींची नावे आहेत.याविषयी रहिवाशांनी सांगितले की, आरोपी आणि तक्रारदार महिला आणि नागरीक सिडको एन-६मधील मथुरानगरात राहतात. ही भावंडे कामधंदा काहीच करीत नाहीत. ते सतत गल्लीतील महिला आणि मुलींची टिंगलउडवतात. त्यांची छेड काढतात. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरासमोरील एका महिलेची बाळूने छेड काढली. यावेळी पीडितेचा पती आणि शेजा-यांनी त्यास जाब विचारला असता बाळूसह सतीशने त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी बाळूला अटक केली आणि २३ रोजी सोडून दिले. त्यानंतर रात्री उशीरा तो दुचाकीने सुसाट गल्लीत आला आणि त्याने आणि सतीशने दहशत निर्माण करीत तक्रारदार महिलेच्या घराच्या खिडकीची काच फोडली.
दोन दिवसापूर्वी पोलिसांना साक्ष देणा-या नागरीकांना शिवीगाळ करीत त्यांची दुचाकी त्याने लोटून देत आडव्या पाडल्या. यावेळी सतीशनेही त्यांना धमकावले. या घटनेनंतर नागरीकांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरूद्ध तक्रार अर्ज दाखल केला. तेव्हा अदखलपात्र गुन्हा नोंदवितो,असे सांगून पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतले. यानंतर आज सकाळी त्याला घरी नेऊन सोडले. दहशत माजविणा-यास पोलिसांनी घरी आणून सोडल्याचे पाहून रहिवाशी संतप्त झाले.
ठाण्यासमोर ठिय्या
मथुरानगरातील २० ते २५ महिला आणि पुरूषांनी सिडको ठाणे गाठून आरोपी सतीश आणि बाळू यांच्यामुळे आमचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांनी रात्रीच आम्हाला मारहाण केली आणि तुम्ही त्याला कसे सोडले असा जाब नागरीकांनी पोलिसांना विचारला. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सर्वांची समजूत काढून फिर्याद द्या, आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करतो, असे आश्वासित केले आणि तातडीने दोन्ही आरोपी भावांना त्यांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा आणि तोडफोड,मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला.