चोरीच्या दुचाकीवर फिरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:04 AM2021-02-17T04:04:27+5:302021-02-17T04:04:27+5:30
वाळूज महानगर : मित्राच्या मदतीने दुचाकी चोरून फिरणाऱ्या एकास वाळूज पोलिसांनी सोमवारी (दि.१५) सांयकाळी जेरबंद केले. आरोपी अमोल शिलेदार ...
वाळूज महानगर : मित्राच्या मदतीने दुचाकी चोरून फिरणाऱ्या एकास वाळूज पोलिसांनी सोमवारी (दि.१५) सांयकाळी जेरबंद केले. आरोपी अमोल शिलेदार (रा. मांजरी) याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
वाळूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पो.कॉ. प्रदीप बोरुडे, पो.कॉ. साबळे हे सोमवारी वाळूज परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बजाज ट्रक टर्मिनलजवळील रस्त्यावरून एक दुचाकीस्वार वेगाने जात असताना पोलीस पथकाला दिसला. यावेळी पोलीस पथकाने त्या दुचाकीस्वारास थांबण्याचा इशारा केला असता तो सुसाट घटनास्थळावरून पसार झाला. या दुचाकीस्वारावर संशय बळावल्यामुळे पोलीस पथकाने वाळूज-कमळापूर रस्त्यावरून त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरांवर पाठलाग केल्यानंतर त्या दुचाकीस्वारास बजाज कंपनीच्या पार्किंग गेटसमोर पोलिसांनी अडवून त्याची चौकशी केली. दुचाकीस्वार अमोल रामनाथ शिलेदार (२५, रा.मांजरी, ता. गंगापूर) याच्याकडील दुचाकीच्या (एम.एम.२०, ए.जे.५१२२) कागदपत्राची मागणी केली असता त्याने कागदपत्रे हरविल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून ई-चलनवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी मालकाची माहिती न मिळाल्याने पोलिसांनी संशयित अमोल शिलेदार यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
मित्राच्या मदतीने दुचाकी चोरली
संशयित आरोपी अमोल शिलेदार याची कसून चौकशी केली असता त्याने मित्र विकास जगन्नाथ केदार (रा.रामराई) याच्या मदतीने पाच महिन्यांपूर्वी रांजणगावातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही दुचाकी सतीश अर्जुन सोनवणे (रा.रांजणगाव) यांच्या मालकीची असून, या चोरलेल्या दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून अमोल व विकास या दुचाकीचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघा आरोपीविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपी विकास केदारे याचा शोध सुरू आहे.
--------------------