दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:04 AM2021-06-18T04:04:01+5:302021-06-18T04:04:01+5:30
गुन्हे शाखेचे पोहेकॉं. राजेंद्र साळुंके, पोहेकॉं. शेख हबीब, पोहेकॉं. विजय निकम हे खासगी वाहने औरंगाबाद-नगर रस्त्यावर गस्त घालत होते. ...
गुन्हे शाखेचे पोहेकॉं. राजेंद्र साळुंके, पोहेकॉं. शेख हबीब, पोहेकॉं. विजय निकम हे खासगी वाहने औरंगाबाद-नगर रस्त्यावर गस्त घालत होते. या मार्गावरील तीसगाव चौफुलीजवळ एक संशयित दुचाकीस्वार दिसून आला. या दुचाकीस्वाराची चौकशी केली असता, त्याने आपले नाव अप्पासाहेब विठ्ठल राऊत (२५ रा.शहापूर-घोडेगाव) असल्याचे सांगत दुचाकी (एम.एच.२०, डी.पी.५१३४): स्वत:ची असून, नातेवाइकांच्या नावावर असल्याचे सांगितले. त्याच्याविषयी संशय बळावल्याने त्या दुचाकीच्या रजिस्ट्रेशन व इंजिन क्रमांकाची ऑनलाइन तपासणी केली. या तपासणीत सदर दुचाकीचा खरा क्रमांक एम.एच.२०, एफ.एन.४२२४ हा असल्याचे व दुचाकीवर टाकण्यात आलेला क्रमांक हा दुसऱ्या दुचाकीचा असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी दुचाकीस्वाराची कसुन चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी गावातील सुदाम राऊत यांच्याकडून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अप्पासाहेब राऊत याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------
कामगाराची दुचाकी लंपास
वाळूज महानगर : कंपनीच्या पार्किंगमधून कामगाराची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिर्झा शहारुख बेग सलीम बेग (रा.गरमपाणी परिसर) हे ८ जून रोजी दुचाकीवरून ( एम.एच.२०, एफ.ए.६१६०) वाळूज उद्योगनगरीतील स्टरलाईट कंपनीत आले होते. कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली.
-----------------
कामगाराची चार बोटे तुटली
वाळूज महानगर : अकुशल कामगारास प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडून त्याची चार बोटे तुटल्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जय भारत बनकर (२६, रा.रांजणगाव) हा वाळूज एमआयडीसीतील प्रीसाईज कट युनिट या कंपनीचा कामगार आहे. १६ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जय बनकर हा कंपनीत कामासाठी गेला होता. रात्री ११.३० वाजता सुट्टी झाल्यानंतर जय यास पर्यवेक्षक मुगले यांनी रात्री ओव्हर टाईमसाठी थांबवून प्रेस मशीनवर काम करण्यास सांगितले. पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास जय बनकर याचा डावा हात यंत्रात अडकून त्याची चार बोटे तुटली. यानंतर इतर कामगारांनी जयला खासगी रुग्णालयात दाखल केले. तांत्रिक शिक्षण नसताना प्रेस मशीनवर अकुशल कामगारास काम करण्यास भाग पाडून त्याची बोटे तुटण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनी मालक आशिष कटारिया, रजनीश कटारिया, व्यवस्थापक क्षीरसागर व पर्यवेक्षक सुरज या चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------