फ्लेमिंगोसह पाहुण्या पक्ष्यांचे जायकवाडी धरणावर आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:40 PM2018-12-07T13:40:22+5:302018-12-07T13:51:54+5:30
लोभस रुप असणाऱ्या फ्लेमिंगोसह इतर पाहुण्या पक्ष्यांचे जायकवाडी धरणावर आगमन झाले असून पर्यटकांना ते भुरळ घालत आहेत.
पैठण (औरंगाबाद ) : रुबाबदारपणा, लाल बुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे लोभस रुप असणाऱ्या फ्लेमिंगोसह इतर पाहुण्या पक्ष्यांचे जायकवाडी धरणावर आगमन झाले असून पर्यटकांना ते भुरळ घालत आहेत. यातील फ्लेमिंगो पक्षी धरणाचे आकर्षण ठरत आहे. यंदा दुष्काळामुळे महिनाभर उशिराने या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.
पैठण येथील नाथसागर जलाशयाच्या आकर्षणात भर घालणारे तसेच ज्यांची पर्यटकांसह पक्षीप्रेमींना आतुरता असते अशा देश-विदेशी पक्ष्यांचे थवेचे थवे हजारो कि.मी.चे अंतर पार करीत येथे येण्यास सुरूवात झाली आहे. मोबाईल व कॅमेऱ्यात हे विहंगम दृश्य टिपण्यासाठी पक्षीप्रेमी व पर्यटकांची पाऊले नाथसागराकडे वळू लागली आहेत. नाथसागराच्या किनाऱ्यावर रोज सकाळी व संध्याकाळी पक्ष्यांच्या हालचाली, सुरेल आवाजाच्या प्रभावाने या परिसरातील प्रसन्नतेमध्ये भर पडत आहे. निसर्गाची किमया व पक्ष्यांची दुनिया जवळून अनुभवयाची असल्यास नाथसागरासारखे दुसरे ठिकाण मराठवाड्यात तरी नाही. निरव शांतता पसरलेल्या तसेच धरणाच्या कडेला आणि मानवी हस्तक्षेप नसणाऱ्या शांत परिसरात किडे, मासे आदी खाद्यावर हे पक्षी आपली गुजरान करीत असतात.
निसर्गाचा बेत घेत धरणाकडे आगेकूच
यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हिवाळा लांबला गेला. परिणामी थंडी उशिरा पडण्यास सुरूवात झाली. डिसेंबर महिना उजाडताच थंडी पडायला सुरूवात झाली. त्यामुळे निसर्गाचा बेत घेत हे देशी-विदेशी पक्षी जायकवाडी धरणाकडे महिनाभर उशिरा का होईना आगेकूच करत आहेत. यावर्षी दुष्काळामुळे नाथसागर वगळता मराठवाड्यातील छोट्या मोठ्या धरणांसह तलावांचे पाणी आटून गेले आहे. देशी -विदेशी पक्ष्यांना पसंतीचे सोयीस्कर ठिकाण नाथसागर वाटत असल्याने त्यांनी आपला मोर्चा जायकवाडीकडे वळविला आहे.
देश-विदेशातील पक्षी
युरोप, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, भूतान, लडाख, बलुचिस्तान, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमधून येथे पक्ष्यांचे आगमन होत असते. स्पून बिल, व्हाइट आयबीज, ग्लासी आयबीज, पोचार्ड, स्पॉट बिल, गोल्डन डक, कुट, गल, बार हेडेड, गुज, किंगफिशर, पाइड किंगफिशर, स्मॉल ब्ल्यू, व्हाइट थ्रोट, कमळसह फ्लेमिंगो पक्ष्यांची नाथसागरावर शाळा भरत आहे.
विणीच्या हंगामासाठी विदेशी पक्ष्यांचे नाथसागराला पसंती :-
परदेशात या दिवशी हिमवृष्टीस सुरूवात होते. त्यामुळे अंडी घालणाऱ्या मादींना ठिकाण बदलावे लागते. त्यादृष्टीने विदेशी पक्षी भारतातील इतर धरणासह नाथसागरावर येतात. येथे विणी घालून उन्हाळ्यात म्हणजे मार्चच्या प्रारंभी हे विदेशी पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात.
विलोभनीय कसरत, आकाशात फेरफटका
पैठणसारख्या पर्यटक व धार्मिक देवस्थान असलेल्या शहरात पाणकावळ्या, भोरड्या या पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. दररोज सूर्यास्तावेळी आकाशात त्यांच्या हवाई कसरती सुरू असतात. हे विलोभनीय दृश्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. आकाशात कधी उंच तर कधी खाली गिरक्या घालतानाचा नजारा पर्यटकांना दिवाना करत आहे.