जलवर्षावात गणेशाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:27 AM2017-08-26T00:27:59+5:302017-08-26T00:27:59+5:30
मोरया रे़़़ बाप्पा मोरया रे़़़ च्या जयघोषात व रिमझिम पावसात भक्तांना चिंब भिजवित गणाधिराज विराजमान झाले़ यंदा १२ दिवस मुक्काम करणाºया लाडक्या बाप्पांचे स्वागत जल्लोषात झाले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मोरया रे़़़ बाप्पा मोरया रे़़़ च्या जयघोषात व रिमझिम पावसात भक्तांना चिंब भिजवित गणाधिराज विराजमान झाले़ यंदा १२ दिवस मुक्काम करणाºया लाडक्या बाप्पांचे स्वागत जल्लोषात झाले़
गणरायाचे स्वागत करण्यासाठी आज सकाळपासून शहरातील रस्त्यांवर भक्तांची गर्दी झाली होती़ शहरातील सर्व बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती़ सकाळी आठ वाजेनंतर तरोडा नाका, श्रीनगर, शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोंढा या बाजारपेठेत लहान-थोरांसोबतच महिलांनीही पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी धाव घेतली़ मालेगावरोड , तरोडानाका ते श्रीनगरपर्यंतचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता़ वाहनधारकांना या गर्दीतून वाट काढणे अवघड झाले होते़
गणरायासोबतच रिमझिम पावसाचे आगमन झाले़ श्रींच्या वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीच्या स्वागताला पावसानेही हजेरी लावली़ त्यामुळे भक्तगण उल्हासित झाले़ यंदा उशिरा का होईना झालेल्या समाधानकारक पावसामुळे सर्वच गणेश मंडळांनी जोरदार तयारी केली़ जिल्ह्यात तीन हजारांवर तर नांदेड शहरात साडेचारशे गणेश मंडळांनी श्रींच्या स्थापनेचे नियोजन केले आहे़ त्यानुसार मागील पंधरा दिवसांपासून गणेशभक्त तयारीला लागले होते़ विघ्ननहर्त्याच्या स्वागतात कसूर राहू नये म्हणून गणेश मंडळांनी ढोल-ताशा, डीजे, झांज पथकांना बाहेरगावाहून आमंत्रित केले आहे़ महागाईचे चटके सहन करीत गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे़ यासाठी अनेक उपक्रम राबविण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे़ स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत़ गणेशाच्या वेगवेगळ्या आकाराच्या लक्षवेधी मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या होत्या़ सोबतच सुशोभिकरणासाठी लागणाºया वस्तूंची दुकाने ठिकठिकाणी व्यापाºयांनी थाटले होते़ प्लास्टिकच्या झिरमाळ्या, आरास, लाडू, मोत्यांचे तोरण, लाईटच्या समया, माळा, फुले, थर्माकोलमध्ये तयार केलेले मंदिरे तसेच मखराचे विविध प्रकार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते़ पूजेसाठी लागणारे आघाडा, केळी, केळीचे खांब, कणीस, डाळींब, दुर्वा, बेल, फुले, गुलाल, कापूर, नारळ आदी साहित्य गुरूवारीच बाजारपेठेत दाखल झाले आहे़ श्रींची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नांदेडकरांनी गुरूवारी व शुक्रवारी मुहूर्त साधला़ यावेळी बालभक्तांनीही बाजारपेठेत गर्दी केली होती़ तरोडानाका, श्रीनगर, वर्कशॉप कार्नर, शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोंढा, आनंदनगर, सिडको आदी ठिकाणी गणेश मूर्तीसोबत इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती़