बाजार समितीत धान्याची आवक घटली; भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:31+5:302021-05-05T04:06:31+5:30
औरंगाबाद : खरीप हंगाम महिन्यावर येऊन ठेपला आहे. मात्र, कोरोना व त्यामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अजूनही शेतकऱ्यांची खरिप पूर्व ...
औरंगाबाद : खरीप हंगाम महिन्यावर येऊन ठेपला आहे. मात्र, कोरोना व त्यामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अजूनही शेतकऱ्यांची खरिप पूर्व तयारीची लगबग दिसत नाही. याचा मोठा परिणाम जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याच्या आवक-जावकवर झाला आहे.
सध्या वार्षिक धान्य खरेदीचे दिवस आहेत. तसेच खरिपातील बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकरी धान्य विकत असतात. यामुळे बाजार समितीत शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची एकच गर्दी उसळलेली असते. मात्र, यंदा कोरोनामुळे हे दृश्य लोपले आहे. ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरले आहेत. यामुळे शेतकरी त्यांच्याकडील धान्य विक्रीला आणत नाहीत. शहराच्या सीमेवर कोरोना तपासणी सुरू आहे. पॉझिटिव्ह निघालो, तर धान्य विक्री राहील बाजूला, पुढील १४ दिवस दवाखान्यात घालवावे लागतील, अशी भीती त्यांच्यामध्ये आहे. यामुळे शेतकरी बाजार समितीत धान्य आणायचे धाडस करत नाहीत.
दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अडत बाजाराची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान ठेवल्याने वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी बाजार समितीकडे पाठ फिरवली. त्यामुळे दिवसभर अडत बाजारात शुकशुकाट असतो. मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमधून धान्याची आवक होत असल्याने मागील महिनाभरापासून धान्याचे भाव स्थिर आहेत.
----
चौकट
धान्य आवक भाव (प्रति क्विंटल)
गहू ११० १६००-२००० रु.
ज्वारी ६२ १५००-२४०० रु.
बाजरी ३३ १२५०-१४०० रु.
मका १५३ १२५०-१४५० रु.
--
( प्रतिक्रिया )
चौकट
कोरोनामुळे शहरात येणे टाळतो
आमच्या गावातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गाव सोडून आम्ही शेतात राहण्यास गेलो आहोत. यामुळे शहरात धान्य विक्रीसाठी येणे टाळत आहोत.
- रामभाऊ पळसकर
शेतकरी
---
वेळ कमी असल्याने येणे टाळतो
लॉकडाऊनमुळे अडत बाजाराची वेळ सकाळी ७ ते ११ करण्यात आली आहे. आम्हाला धान्य घेऊन येण्यास १२ वाजतात. पोलीस अडवतात, कोरोना तपासणी करतात. या कारणामुळे आम्ही अडत बाजारात येणे टाळतो.
- वसंत पठाडे
शेतकरी
----
चौकट
वेळेचा परिणाम
लॉकडाऊनमुळे अडत बाजाराची वेळ सकाळी ७ ते ११ करण्यात आली आहे. पुण्यात सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान अडत बाजार सुरू असतो. शेतकऱ्यांना घरून निघेपर्यंत ११ वाजतात. याचा परिणाम आवकेवर झाला आहे.
- हरिष पवार
अडत व्यापारी
---
लॉकडाऊनमुळे ग्राहक कमी
लॉकडाऊनमुळे ग्राहकही जाधववाडी धान्याच्या अडत बाजारात येणे टाळत आहेत. वार्षिक धान्य खरेदीचा हंगाम असतानाही अडत बाजारात शुकशुकाट जाणवत आहे.
- कन्हैयालाल जयस्वाल
अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना