‘ऑरिक’मध्ये बहुराष्ट्रीय कंपनीचे आगमन; रशियन स्टील उद्योग उभारणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 02:36 PM2020-11-11T14:36:51+5:302020-11-11T14:47:00+5:30

करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिक सिटीलगत सुमारे ४३ एकरवर (१ लाख ७७ हजार ५३७ चौरस मीटर) हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

The arrival of a multinational company in ‘Auric’; Beginning of the Russian steel industry | ‘ऑरिक’मध्ये बहुराष्ट्रीय कंपनीचे आगमन; रशियन स्टील उद्योग उभारणीला सुरुवात

‘ऑरिक’मध्ये बहुराष्ट्रीय कंपनीचे आगमन; रशियन स्टील उद्योग उभारणीला सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देभारतासह जगभरातील ३०-४० देशांत ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते.दोन टप्प्यांत ५ हजार ८०० कोटींची गुंतवणूक 

- विजय सरवदे 
औरंगाबाद : दिवाळीचा मुहूर्त साधत ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाने ‘ऑरिक सिटी’मध्ये  प्रकल्प उरभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ही बहुराष्ट्रीय कंपनी दोन टप्प्यांत तब्बल ५ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक औरंगाबादेत करणार आहे. 

करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिक सिटीलगत सुमारे ४३ एकरवर (१ लाख ७७ हजार ५३७ चौरस मीटर) हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ‘एनएलएमके’ ही कंपनी ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष स्टील तयार करते. भारतासह जगभरातील ३०-४० देशांत ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तसेच निर्यातीलाही चालना मिळणार आहे. जागा ताब्यात घेऊन लगेच उद्योगाची पायाभरणी करण्यासाठी या उद्योगाच्या लेखा व आयटी विभागाचे प्रमुख राकेशकुमार श्रीवास्तव, तसेच एक रशियन प्रतिनिधी औरंगाबादेत आले. त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी ‘ऑरिक’लगतच्या जागेचा ताबा घेतला. त्यानंतर या उद्योगाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट टीममार्फत प्रत्यक्ष प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

ऑगस्ट महिन्यामध्ये ‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून जागेचा ताबा घेऊन लगेच प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल का, अशी विचारणा ‘एमआयडीसी’चे तत्कालीन सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्याकडे मेलद्वारे विचारणा केली होती. औरंगाबादेत कोरोना, लॉकडाऊनची  स्थिती कशी आहे? बांधकाम मजूर उपलब्ध होतील का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, राज्य, तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांबाबत विचारणा केली होती. तेव्हा कैलास जाधव यांनी या उद्योगाच्या रशियातील व्यवस्थापकीय संचालकांना तात्काळ उत्तर दिले व सप्टेंबर महिना किंवा त्यानंतर औरंगाबादेत येऊन ताबा घेऊ शकता व लगेच बांधकामालाही सुरुवात करता येईल, असे कळविले.

‘आरबी’ समूहाचीही तयारी
घर, बाथरूम, कपडे स्वच्छ करण्यासाठी लागणारे हार्पिक, लायसॉल, डेटॉल, वनिश, फिनिश आदी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार करणाऱ्या रेकीट बेंकिजर (आरबी) या उद्योग समूहाने औरंगाबादेत कंपनी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे या कंपनीचा सामंजस्य करार तूर्तास थांबला आहे.

Web Title: The arrival of a multinational company in ‘Auric’; Beginning of the Russian steel industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.