औरंगाबादेत साधू-संतांच्या आगमनाने चैैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:53 PM2018-07-22T23:53:41+5:302018-07-22T23:55:57+5:30
इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी... रांगोळीने सजविलेले रस्ते... विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांनी आणलेली रंगत... रविवारी (दि.२२) सकाळी अशा मंगलमय वातावरणात अध्यात्मयोगी आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव यांनी शहरात प्रवेश केला तेव्हा उपस्थित शेकडो श्रावक-श्राविकांनी ‘जयकारा गुरुदेव का जय जय गुरुदेव’ असा गगनभेदी जयघोष केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी... रांगोळीने सजविलेले रस्ते... विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांनी आणलेली रंगत... रविवारी (दि.२२) सकाळी अशा मंगलमय वातावरणात अध्यात्मयोगी आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव यांनी शहरात प्रवेश केला तेव्हा उपस्थित शेकडो श्रावक-श्राविकांनी ‘जयकारा गुरुदेव का जय जय गुरुदेव’ असा गगनभेदी जयघोष केला. चातुर्मासानिमित्ताने १९ साधू-संतांच्या आगमनाने सकल जैन समाजात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. एक अभूतपूर्व शोभायात्रा अनुभवल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रत्येक जण व्यक्त करीत होते.
खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजारतर्फे चातुर्मास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो कि.मी.चा पायी प्रवास करून आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव ससंघ शहरात पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळी ६ वाजेपासून जैन समाजबांधव जमा झाले होते. महाराज ससंघाचे आगमन झाले तेव्हा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आकाशवाणी चौकात सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी गुरुदेव ससंघाचे स्वागत केले. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, प्रफुल्ल मालाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी जालना रोडवरील इमारतीवरून साधू-संतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘कोण आये भाई कोण आये... जैन धर्म के वीर आये’, ‘जयकारा गुरुदेव का जयजय गुरुदेव’ असा जयघोष केला जात होता. सुवासिनी मंगलकलश डोक्यावर घेऊन अग्रभागी चालत होत्या. काही महिलांनी हाती पंचरंगी ध्वज घेतला होता. तर काही महिला टाळ वाजवीत भजन म्हणत नृत्य करीत होत्या. पी. यू. जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युवकांच्या ढोल पथकाने ढोलवादन करून परिसर दणाणून सोडला होता. बँड पथकांनी धार्मिक, देशभक्तीपर गीत सादर करून शोभायात्रेची रंगत आणखी वाढविली. शोभायात्रेत आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव सर्वात पुढे, त्यांच्या मागे १९ साधू-संत व त्यांच्या मागे सर्व श्रावक-श्राविका चालत होते. शोभायात्रा मार्गावर जागोजागी सुरेख रांगोळी काढण्यात आल्या होत्या. जागोजागी गुरुदेवांचे पादप्रक्षालन केले जात होते. रस्त्याच्या कडेला थांबून भाविक गुरुदेव ससंघाचे दर्शन घेत होते.
शोभायात्रा मोंढानाका, लक्ष्मण चावडी, गांधीनगर, मोतीकारंजा, चौराहा, किराणा चावडीमार्गे राजाबाजारातील जैन मंदिरात पोहोचली. येथे पार्श्वनाथ भगवंतांचे दर्शन घेऊन शोभायात्रा नवाबपुरा येथील हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगणात पोहोचली. येथे १०८ दाम्पत्यांनी साधू-संतांचे पादप्रक्षालन केले तेव्हा हे दृश्य हजारो भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. येथे आयोजित कार्यक्रमात जैन पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी, हिराचंद कासलीवाल परिवार यांनी गुरुदेवाचे पादप्रक्षालन केले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले. यावेळी सकल जैन समाजाचे महावीर पाटणी, मिठालाल कांकरिया, तसेच अशोक अजमेरा, अॅड. एम. आर. बडजाते, विनोदकुमार लोहाडे, माणिकचंद गंगवाल, अॅड. डी. बी. कासलीवाल, अॅड. प्रमोदकुमार कासलीवाल, प्रकाश पाटणी, विजयकुमार पाटणी यांच्यासह सर्व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.
अंतरात्म्यातील भगवंताला प्रकट करा - आचार्य विशुद्धसागरजी
हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल मैदानावरील भव्य धर्मपीठावर कमळाच्या सजावटीत आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव व १९ साधू-संत विराजमान झाले होते. यावेळी औरंगाबादपर्यंतच्या पायी प्रवासात साधू-संतांची सेवा करणारे संघपती, संजय कासलीवाल परिवार व अशोककुमार गंगवाल परिवाराचा गुरुदेव यांनी गौरव केला.
प्रवचनात गुरुदेव म्हणाले की, आज शहरात तीर्थंकर महावीरांचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. ज्यांना मंदिरात जावे वाटते, साधू-संतांचे प्रवचन ऐकावे वाटते ते सर्व श्रावक-श्राविका भविष्यातील भगवंत आहेत. आपल्या अंतरात्म्यातील भगवंताला प्रगट करा, असे आवाहनही त्यांनी केले.