नियम मोडणा-या चारचाकी चालकाची अरेरावी; पावती देताच वाहतूक पोलिसाला केली धक्काबुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:47 PM2017-10-23T16:47:30+5:302017-10-23T16:54:44+5:30
नियम मोडणा-या चारचाकी वाहनचालकास दंडाची पावती दिल्याच्या कारणावरुन गाडीचालकाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत धक्काबुकी केली.
औरंगाबाद: नियम मोडणा-या चारचाकी वाहनचालकास दंडाची पावती दिल्याच्या कारणावरुन गाडीचालकाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत धक्काबुकी केली. ही घटना रविवारी (दि.२२) सकाळी १० ते १०.१५ वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक येथे घडली.
शेख उस्मान शेख इब्राहिम (३३,रा. भोईवाडा)असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस शिपाई श्रीराम एकनाथराव बदणे हे रविवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी कार क्रमांक एमएच-२० डीजे १८०४ अडविली आणि वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्यांनी कारचालकास दंडाची पावती दिली.
यावेळी आरोपी शेख उस्मान शेख इब्राहिम याला त्याचा राग आला. पावतीचे शुल्क देणे तर दूर त्याने पोलीस शिपाई बदणे यांच्याशी हुज्जत घालणे सुरु केले. बडणे यांनी त्यास खूप समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावरही बदणे यांनी त्यास परत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने चक्क त्यांच्या युनिफॉर्मची कॉलर पकडली आणि धक्काबुकी केली.
यावेळी अन्य पोलीस कर्मचारी मदतीला धावले आणि त्यांनी आरोपीला पकडले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस.आर.चव्हाण हे तपास करीत आहे.