'क्षुल्लक वादातून झाली जाळपोळ,दगडफेक'; पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 07:05 PM2023-03-30T19:05:06+5:302023-03-30T19:06:09+5:30
या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात 400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारची रात्र आणि आजची पहाट यादरम्यान थरारक घटना घडल्या. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेक, जाळपोळमुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नियंत्रणात आणले. याप्रकरणी तब्बल ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या काळात नेमक काय झाले याबाबत पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीस बोलताना माहिती दिली आहे.
पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ तरूणांच्या दोन गटात किरकोळ भांडण झाले. त्यानंतर एका गटातील तरूण निघून गेले. मात्र काही वेळानंतर या ठिकाणी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या एक तासानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा व्हायला सुरूवात झाली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली. पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजकंटकांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना त्यांना थोपवणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच माझ्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आम्ही पोलिस बळाचा वापर करून तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. जमावाने पोलिसांची आणि काही खासगी वाहने जाळली. पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या सर्वावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
परिस्थिती जाणून कारवाई केली
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी पोलिस उशिरा पोहोचले असा आरोप केला आहे. यावर पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले, समाजकटकांनी किराडपुरा भागातील लाईट फोडल्यामुळे अंधार झाला होता. अशावेळी नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊनच आम्ही कारवाई केली.
राडा प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल
क्षुल्लक वादाचे पर्यवसन पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेले. यात पोलिसांची वाहने, खाजगी वाहने जाळण्यात आली. १६ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी आहेत. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात 400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली गुन्हा दाखल 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.