‘कृत्रिम मानवी बाॅडी’ सांगते उपचार चूक की बरोबर! भावी डाॅक्टरांना सराव झाला सोपा
By संतोष हिरेमठ | Published: April 25, 2024 05:06 PM2024-04-25T17:06:54+5:302024-04-25T17:07:20+5:30
थेट रुग्णांवर प्रयोग टाळण्यास मदत, खरा देह उपलब्धतेलाही पर्याय, घाटी रुग्णालयातील ‘स्किल लॅब’मध्ये २० ‘कृत्रिम बाॅडी’
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णांवर उपचाराचा सराव आणि अभ्यासासाठी मानवी देह महत्त्वाचे ठरतात. मात्र, देहदानाचे प्रमाण कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये एखादा देह मिळतो. यावरच मात करण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागात ‘स्किल लॅब’ साकारण्यात आली आहे. याठिकाणी २० ‘कृत्रिम मानवी बाॅडी’ असून, याद्वारे सलाइन देणे, टाके टाकणे, ‘बीपी’ तपासणे यासह प्रसूतीचाही सराव करता येतो. इतकेच नाही तर भावी डाॅक्टरांनी सरावात काही चूकही केली तर ते लक्षात आणून दिले जाते.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानांकनानुसार आठ विद्यार्थ्यांमागे एक मानवी शरीर अभ्यासासाठी मिळावे, असा संकेत आहे. प्रत्यक्षात मात्र २० ते २५ विद्यार्थ्यांमागे एक देह देण्याची वेळ अनेकदा ओढवते. कारण देहदानाचे प्रमाण कमी आहे. घाटीत २०२३-२४ या वर्षासाठी ८ देह उपलब्ध होते; तर विद्यार्थिसंख्या २०० आहे. जानेवारीत तर केवळ तीन देहच होते. रुग्णालय प्रशासनाने विविध माध्यमांतून प्रयत्न केले आणि देहदान वाढले. सध्या येथे १४ देह आहेत. कधी देहदान होते, तर कधी नाही. यावर काही प्रमाणात का होईना पर्याय शोधण्यासाठी घाटीत अत्याधुनिक अशी ‘स्किल लॅब’ साकारण्यात आली आहे. याठिकाणी अत्याधुनिक यंत्रणेसह कृत्रिम देह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कृत्रिम बाळाचाही जन्म
प्रसूतीचा सराव करताना कृत्रिम बाळाचाही जन्म होतो. त्याबरोबर हृदय कसे असते, इंजेक्शन, सलाइन कशा पद्धतीने द्यावे, याचाही सराव कृत्रिम देहावर करता येतो. कृत्रिम देह सरावासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. त्यासोबत खऱ्या मानवी देहांचीही गरज कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना फायदा
शरीररचनाशास्त्र विभागात अत्याधुनिक अशी स्किल लॅब साकारण्यात आली आहे. याठिकाणी अनेक सोयीसुविधा देण्यात आल्या असून, या स्किल लॅबचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना फायदा होईल.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता
सराव करणे सोपे
स्किल लॅबमध्ये सध्या २० रबराचे कृत्रिम शरीर (मॅनेक्विन) आहेत. त्यांच्या मदतीने खऱ्या रुग्णांवर होणाऱ्या शल्यक्रिया, विविध तपासण्या, प्रसूती आदींचा सराव शिकाऊ डाॅक्टरांना करता येतो. थेट रुग्णांवर प्रयोग करण्याऐवजी स्किल लॅबमध्ये सराव, संशोधन करून वैद्यकीय शिक्षण घेणे शक्य झाले आहे.
- डाॅ. अर्चना कल्याणकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग, घाटी