प्रयोगाला महिना झाला; पाऊस नाही कुणी पाहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 05:13 PM2019-09-10T17:13:10+5:302019-09-10T17:15:17+5:30
कृत्रिम पावसासाठी उड्डाणावर उड्डाणे
औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफि केशनचे विमान उड्डाणावर उड्डाण घेत असून, त्यातून हाती काय लागले हे अद्याप महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पडणारा पाऊस हा कृत्रिम आहे की नैसर्गिक, याचे स्पष्टीकरण आजवर दिलेले नाही. प्रयोगाला ९ सप्टेंबर रोजी महिना झाला. मात्र, पाऊस कुणी नाही पाहिला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले जात असले, तरी त्यातून खूप काही हाती लागत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे. विभागात आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने रसायनांची फवारणी केली जात आहे. मात्र, किती पाऊस झाला, याचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रयोगाला एक महिना झाला आहे. १७ आॅगस्टपासून नियमित प्रयोगाला सुरुवात झाली. २६, २७ व २८ आॅगस्ट रोजी ढग नसल्यामुळे प्रयोग झाला नाही. २९ रोजी विमानाने १८ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले. परभणी, जालना, बीड जिल्ह्यांतील ९ गावांवर हा प्रयोग करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी ३६ फ्लेअर्स ढगांमध्ये जाळण्यात आले. जालना, औरंगाबाद, बुलडाणा परिसरातील १८ गावांवर प्रयोग करण्यात आला. ३१ आॅगस्ट रोजी १६ फ्लेअर्स विमानाने ढगांमध्ये सोडले. जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांतील १६ गावांवर हा प्रयोग करण्यात आला.
१ सप्टेंबर रोजी २ वाजेच्या सुमारास सी-९० विमान आकाशात झेपावले. ५ वाजता ते विमान खाली उतरले. १२ फ्लेअर्स जाळण्यात आले. कृष्णपूर, पैठण, थेरगाव, बाभूळगाव, वैजापूर, फुलंब्री, निधोना, वानेगाव भागात हा प्रयोग करण्यात आला. २ सप्टेंबर रोजी २२ फ्लेअर्स बीडमधील १७ गावांवरील ढगात सोडले. ३ सप्टेंबर रोजी रेस्ट डे घेतल्यानंतर ४ रोजी २० फ्लेअर्स औरंगाबाद व बीडमधील १० गावांवरील ढगांत सोडण्यात आले. ५ रोजी २४ फ्लेअर्स बीड व परभणी जिल्ह्यांतील १२ गावांवर सोडले. ६ व ७ सप्टेंबर रोजी प्रयोग झाला नाही. ८ सप्टेंबर रोजी १४ फ्लेअर्स जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतील ७ गावांवरील ढगांत सोडले.
१८ दिवस केले उड्डाण
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली असली तरी आजवर १८ दिवसच उड्डाण करण्यात आले आहे. २३५ फ्लेअर्स आजवर ढगांमध्ये सोडण्यात आले आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. ९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत किती पाऊस झाला, याची नोंद अद्याप प्रशासनाने दिलेली नाही.