मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आज चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 03:54 PM2019-08-09T15:54:38+5:302019-08-09T16:10:05+5:30
रसायने फवारल्यानंतर १५ मिनिटे ते एक तासात पाऊस पडण्याचा दावा
औरंगाबाद : दीड महिन्याच्या चर्चेनंतर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला मुहूर्त लागला आहे. शुक्रवारी प्रयोगाची चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी सी-९० हे विमान विमानतळावर शुक्रवारी सकाळी दाखल झाले. मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात ५२ दिवस कृत्रिम पावसाचे प्रयोग होतील, अशी माहिती सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) माजी शास्त्रज्ञ डॉ. जी. आर. कुलकर्णी यांनी दिली.
विभागीय आयुक्तालयात सी-डॉप्लर रडार बसविले असून ते कार्यान्वितही करण्यात आले आहे. मुंबईहून आलेल्या तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचा-यांची शास्त्रज्ञांनी आयुक्तालयात गुरुवारी कार्यशाळा घेतली. त्यानंतर डॉ. कुलकर्णी, हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी प्रयोगाबाबत पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी श्रीरंग घोलप, कानुराज बगाटे, दत्त कामत, महसूल उपायुक्त सतीश खडके, उपजिल्हाधिकारी मृणालिनी निंबाळकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती.
योग्य वातावरण निर्मिती होत नसल्याने प्रतीक्षा https://t.co/G3RUbDd5aB
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 9, 2019
प्रयोगासाठी राज्य व केंद्राच्या विभागाकडून १५ परवानग्याही घेतल्या आहेत. शुक्रवारी प्रयोगाच्या चाचणीसाठी प्रथम विमानाचे उड्डाण होणार असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. रसायने फवारल्यानंतर १५ मिनिटे ते एक तासात पाऊस होईल, असा दावा यावेळी करण्यात आला. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत प्रयोग करण्याचे नियोजन असून, त्यापुढे परतीच्या पावसासाठी यंत्रणा ठेवली जाईल, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
ढगाचा अंदाज घेतल्यानंतर प्रयोग
नियंत्रण कक्षात रोज सकाळी ११ वाजता तंत्रज्ञांची बैठक होईल. यात ढगांचा अंदाज घेऊन पाऊस पाडण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सिल्व्हर कोटेड सिलिंडर्ससह विमान उड्डाण घेईल. औरंगाबादसह सोलापूर, नागपूर, मुंबई व पुणे येथील रडारचीही मदत घेतली जाईल. कमी पाऊस झालेल्या भागातच कृत्रिम पावसाचा प्रयोग होईल. प्रयोगाअंती किती पाऊस झाला याची नोंद घेतली जाईल. एकदा उड्डाण घेतलेल्या विमानातून १० ते १५ ढगांवर फवारणी केली जाऊ शकते. २०० किलो रसायन घेऊन उडण्याची क्षमता विमानात आहे. विमान ६ तास हवेत राहू शकते, असा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.