कृत्रिम पाऊस पश्चिम महाराष्ट्रात; विमानाचा थांबा मराठवाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:30 PM2018-07-06T15:30:27+5:302018-07-06T15:31:59+5:30
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे
- विकास राऊत
औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे. सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग आगामी चार महिन्यांसाठी केला जाणार असून, त्यासाठी वापरण्यात येणारे विमान मात्र औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेईल. ज्या दिवशी प्रयोग नसेल, त्या दिवशी विमान येथेच थांबेल.
केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग ३ जुलैपासून सुरू झाला आहे. २५० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात आली असून, त्यातून दोन विमानांची खरेदी देखील करण्यात येणार आहे. ती विमाने कोणत्या विमानतळावर थांबतील, याबाबत अद्याप काहीही सूचना नाहीत.
सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्य छायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता. ख्याती वेदर मॉडिफि केशन या कंपनीला तीन वर्षांपूर्वी कंत्राट दिले होते. आता तीच कंपनी सोलापूर परिसरात प्रयोग करणार आहे.
पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. ३ जुलैपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग सुरू झाला आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे असल्याचे ते म्हणाले.
या प्रश्नाची उत्तरे मिळेनात
प्रयोगासाठी वापरण्यात येणारी स्फोटके कुठे ठेवणार, सोलापूर परिसरात प्रयोग केल्यानंतर विमान औरंगाबादेत थांबल्यानंतर उड्डाण घेताना मराठवाड्यातही सिलव्हर कोटेड सिलिंडर हवेत सोडणार की फक्त उड्डाण घेणार. विमान यावर्षी खरेदी करण्यात येणार आहे की नाही. खरेदी केल्यास त्यासाठी औरंगाबादची धावपट्टी वापरणार काय, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
का हवे होते औरंगाबादला केंद्र
३०० ते ४५० कि़ मी. परिसर औरंगाबाद येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा व पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो; परंतु २०० कि़मी.च्या अंतरातच सोलापूरमधून प्रयोग होणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला त्याचा फारसा लाभ होणार नाही,असे मत हवामानतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
आयआयटीएमने सांगितले
आयआयटीएम पुण्याचे जनसंपर्क अधिकारी शिवसाई दीक्षित यांनी सांगितले, विमान औरंगाबादच्या विमानतळावर थांबण्याबाबत निर्णय झाला आहे. औरंगाबाद येथून कृत्रिम प्रयोगासाठी फक्त उड्डाण होईल. सध्या विमान बारामतीमध्ये आहे. सिल्व्हर कोटेड सिलिंडर कुठे ठेवणार, विमान औरंगाबादेतून उडताना सिलिंडर फोडणार की नाही. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे दीक्षित यांनी सांगितले.