दलालांची संख्या वाढल्याने खतांची कृत्रिम टंचाई : हरिभाऊ बागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 07:44 PM2020-08-24T19:44:46+5:302020-08-24T19:47:19+5:30
करमाड येथे भाजपाचे रास्तारोको आंदोलन
करमाड : महाआघाडी सरकारच्या अनेक फसव्या आश्वासनामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. बांधावर खत योजना सुध्दा फसवी आहे. उलट यामुळे खत विक्री प्रक्रियेत दलालांच्या संख्येत वाढ होऊन खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येऊन शेतकर्यांकडुन जास्तीचे पैसे लुबाडण्यात येत असल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. सोमवारी औरंगाबाद तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बागडे बोलत होते.
सकाळी 11 वाजता भाजपचे आंदोलन सुरु झाले. यावेळी आ. बागडे यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर असतांना खतासाठी शेतकर्यांना कधीही रांगा लावायची वेळ आली नाही तर कधी विमा कंपन्यांना भांडायची वेळ आली नाही अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर चौफेर टीका केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे तात्काळ करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सोबतच पीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणी आ. बागडे यांनी यावेळी केली. तहसीलदार कृष्णा कानगुले यांन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, दामुअण्णा नवपुते, अशोक साळुंके, सजनराव मते, भावराव मुळे, गणेशराव दहिहंडे, तुकाराम तारो, दत्ता उकर्डे, रामकिसन भोसले, सजन बागल, सरसाबाई वाघ, अनिल हेरडे, दिनेश शेळके यांच्यासह शेतकर्यांचा सहभाग होता.
वाहतूक खोळंबली
आंदोलनकर्त्यांनी 45 मिनीटे महामार्गावर ठाण मांडल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकर्यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले डाळिंब व टमाटे आंदोलनस्थळी आणले होते.