अरुण बोर्डे, राजू आमराव गटांत मध्यरात्री तुंबळ हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:28 PM2022-04-07T18:28:50+5:302022-04-07T18:30:13+5:30
कोकणवाडी चौकात मध्यरात्री १२ वाजेची घटना
औरंगाबाद : दलित चळवळीतील कार्यकर्ते राजू आमराव आणि एमआयएमचे अरुण बोर्डे यांचे दोन्ही गट बुधवारी मध्यरात्री आमनेसामने आले. कोकणवाडी चौकात दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जखमींना त्वरित घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले.
अरुण बोर्डे आणि राजू आमराव यांच्यात जुने वैर आहे. यापूर्वी तलवारीनेही एकमेकांवर हल्ला केला होता. बुधवारी मध्यरात्री कोकणवाडी चौकात आमराव यांचे किमान दीडशेपेक्षा अधिक कार्यकर्ते जमा झाले. थोड्याच वेळात बोर्डे यांचेही त्यापेक्षा अधिक समर्थक तेथे आले. दोन्ही गटांमध्ये लाठ्याकाठ्या, लोखंडी गजाने हाणामारी सुरू झाली. आमराव यांचे समर्थक राहुल गायकवाड यांच्या डोक्यात लोखंडी गज लागल्याने ते गंभीर जखमी झाले. अरुण बोर्डे यांचाही पाय फ्रॅक्चर झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बराच वेळ हा राडा सुरू होता.
घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर, क्रांतीचौक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेदांतनगर पोलीस ठाण्यात सुरू होती. घाटी रुग्णालयात रात्री आठ ते दहा जखमी दाखल झाले होते. डॉ. आंबेडकर जयंतीचे बॅनर लावण्यावरून या वादास तोंड फुटले.