स्फोटक शोधण्यात तरबेज श्वान आर्याचे निधन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कारावेळी हॅण्डलर्सला अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 07:38 PM2021-06-17T19:38:59+5:302021-06-17T19:48:49+5:30
२०१२ साली आर्या पोलीस दलात दाखल झाली. पुण्यात ६ महिने प्रशिक्षण घेऊन औरंगाबाद बीडीडीएसमध्ये ती दाखल झाली.
औरंगाबाद : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनापूर्वी त्यांच्या सभास्थळासह दौऱ्यात सुरक्षेची काळजी घेणाऱ्या बॉम्बशोधक व नाशक पथकाचा एक सदस्य श्वान आर्याचे गुरुवारी पहाटे निधन झाले. सहायक पोलीस आयुक्तांनी आर्याच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शासकीय इतमामात आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा छावणी स्मशानभूमीत उपस्थित पोलिसांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
‘कुत्र्या, मांजराचं जीणं नशिबी येऊ नये,’ असा संवाद आपल्या कानावर पदोपदी पडत असतो. परंतु कोणताही जीव जन्माने नव्हे, तर कर्माने महान होतो, हे पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील श्वान आर्याच्या निधनाच्या निमित्ताने पुन्हा दिसले. १२ वर्षीय श्वान आर्याने गर्भपिशवीच्या आजारामुळे बुधवारी अंतिम श्वास घेतला. २०१२ साली आर्या पोलीस दलात दाखल झाली. पुण्यात ६ महिने प्रशिक्षण घेऊन औरंगाबाद बीडीडीएसमध्ये ती दाखल झाली. शहरातील विमानतळ, औरंगाबाद खंडपीठ, जिल्हा न्यायालय, रेल्वेस्थानक, बसस्थानक, विभागीय आयुक्तालय आदी महत्त्वाच्या ठिकाणांची स्फोटक तपासणी आर्या आपल्या सहकाऱ्यासह करीत होती. यासोबत महाराष्ट्रातील विविध शहरांसह आणि गोवा राज्यात व्ही.व्ही.आय.पीं.च्या दौऱ्यात सहभागी होऊन आर्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
सहा महिन्यांपासून आर्या गर्भाशयाच्या आजाराने त्रस्त होती. तिच्यावर शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवाय तिला सांधेदुखीचा त्रास होता. यातच गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आर्याची प्राणज्योत मालवली. यानंतर आर्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सजविलेल्या वाहनातून तिची अंत्ययात्रा काढून छावणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सहायक पोलीस आयुक्त विश्वंबर गोल्डे, पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांनी आर्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलाने सलामी देत बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडल्या. पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्यासह बीडीडीएसचे अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
हॅण्डलर्सला अश्रू अनावर
गेल्या पाच वर्षांपासून पोलीस हवालदार कृष्णा काळे आणि हवालदार कचरू कापसे आर्याचे हॅण्डलर म्हणून काम पाहत होते. आर्याच्या अंत्यसंस्कारप्रसंगी त्यांना अश्रू अनावर झाले. यामुळे वातावरण गंभीर बनले होते. श्वान आर्या स्फोटक शोधण्यात अत्यंत तरबेज आणि आज्ञाधारक होती, असे पोलीस निरीक्षक जुमडे यांनी सांगितले.