महागाईचा परिणाम? ... गोडेतेलाचा टँकर पलटी होताच स्थानिकांची भांडे घेऊन गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 02:02 PM2022-11-23T14:02:50+5:302022-11-23T14:04:14+5:30
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी आडूळ येथील बाह्यवळणावर घडली.
अपघाताच्या घटनांनंतर लोकांनी अपघातस्थळावरुन कोंबड्या, बिअरच्या बाटल्या आणि मोबाईल एसेसिरीज पळवल्याचे आपण पाहितं होतं. आता, औरंगाबादच्या आडूळजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर देखील असाच काही प्रकार पाहायला मिळाला. औरंगाबादकडून बीडकडे गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. त्यानंतर, स्थानिकांनी या टँकरमधील तेल घरी घेऊन जाण्यासाठी एकच गर्दी केली होती. वाढत्या महागाईमुळे म्हणा की लोकांना फुकटचं काहीही चालतं म्हणून म्हणा, पण लोकांची ही कृती व्हायरल झाली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी आडूळ येथील बाह्यवळणावर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, औरंगाबादकडून बीडकडे (जी.जे. 12. बी. एक्स-6442) हा टँकर गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जात होता. आडूळ येथील बाह्यवळणावर येताच समोर जाणाऱ्या वाहनचालकाने टँकरला हुलकावणी दिली. त्यामुळे समोरील वाहनाला वाचविण्याच्या नादात टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तेलाने भरलेला हा टँकर रस्त्याखाली जाऊन पलटी झाला. याबाबत माहिती मिळताच, स्थानिकांनी मिळेत ते भांडे घेऊन टँकरस्थळी धाव घेतली.
रजापूर, थापटी, आडूळ, देवगाव आदी आसपासच्या गावातील काही लोकांनी टॅकरच्या दिशेने धाव घेत तोबा गर्दी केली. पाण्याच्या टाक्या, डबे, पाण्याचे जार, बादल्या तर कुणी पातेले घेऊन टॅकरच्या दिशेने धावत होते. फुकटचे तेल मिळविण्यासाठी सर्वांचीच धडपड दिसून येते होती. कोणी म्हणत होते, तेलाचे भाव कसले वाढलेत माहितीय का?, अशा चर्चांमधून महागाईचाही अंदाज लावता येत होता. दरम्यान, याठिकाणी काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.