संपाचा परिणाम, दहावी- बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून; तरीही निकाल वेळेतच होईल जाहीर
By विजय सरवदे | Published: March 18, 2023 05:26 PM2023-03-18T17:26:41+5:302023-03-18T17:27:07+5:30
विद्यार्थी हितासाठी काही शिक्षक पेपर तपासत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा सध्या सुरु आहेत. परंतु, जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संपामुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कस्टोडियनकडून आलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळा- महाविद्यालयात पडून आहेत.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. तेव्हापासून सुमारे दहा दिवस कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने बारावीच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर या संघटनेच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कार मागे घेतला. त्यानंतर १४ मार्चपासून जुनी पेन्शन योजना संदर्भात राज्यव्यापी संप सुरू झाला. या संपात कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना सहभागी झाली. विद्यार्थी हितासाठी परीक्षेचे काम करणार ; परंतु उत्तरपत्रिका तपासणार नसल्याची भूमिका या संघटनेने घेतली. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीचे काम खोळंबले आहे. तशीच गत दहावी परीक्षेची देखील झाली आहे. माध्यमिक शिक्षकांचाही संपात सहभाग असल्यामुळे काही शिक्षक पेपर तपासतात, तर काही शिक्षकांनी पेपर तपासणीचे काम थांबविले आहे.
कशी असते पेपर तपासणीची प्रक्रिया
दहावी- बारावीच्या परीक्षेत पेपर संपल्यानंतर केंद्र संचालक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे कस्टोडियनकडे जमा करतात. बोर्डाने दहा- ते पंधरा परीक्षा केंद्रासाठी एक कस्टोडियन नेमलेला असतो. कस्टोडियनकडून यादीतील शाळा- महाविद्यालयांच्या पत्त्यावर तपासणीसाठी उत्तरपत्रिका टपालाने पाठविल्या जातात. मुख्याध्यापक किंवा प्राचार्य संबंधित विषयाच्या शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी देतात. तपासल्यानंतर सदरील उत्तरपत्रिका बोर्ड मार्फत जमा केल्या जातात.
बोर्ड काय म्हणते
यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर थोडाफार परिणाम झाला आहे. तरीही विद्यार्थी हितासाठी काही शिक्षक पेपर तपासत आहेत. तरीही शाळा- महाविद्यालयांत किती गठ्ठे पडून आहेत, याची माहिती २५ मार्चपासून समजेल. त्या दिवसापासून दहावी आणि बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करण्यास सुरूवात केली जाणार आहे. काहीही झाले तरी निकाल वेळेतच जाहीर होईल.