मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप म्हणून रा.रेव्ह. प्रकाश पाटोळे यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 03:42 PM2024-09-16T15:42:21+5:302024-09-16T15:44:45+5:30
पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधीसह झाला पदग्रहण सोहळा
छत्रपती संभाजीनगर : उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळांतर्गतच्या (सीएनआय) मराठवाडा धर्मप्रांताचे चौथे बिशप म्हणून रा.रेव्ह. प्रकाश पाटोळे यांची दीक्षा व पदग्रहण समारंभ शनिवारी (दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी) छावणीतील क्राईस्ट चर्च येथे पार पडला.
बिशप एम.एम. आर्सुड, बिशप ए.के. प्रधान आणि बिशप एम.यू. कसाब यांच्यानंतर बिशप पाटोळे यांनी चौथे बिशप म्हणून पदग्रहण केले. धर्मप्रांताचे सचिव डॉ. लालबहादूर कांबळे यांनी बिशपांचा परिचय करुन दिला व त्यांच्या नेमणुकीच्या अधिकार पत्राचे वाचन केले. रेव्ह. एम.यू. जाधव यांनी प्रार्थना केली. रेव्ह. सुशील घुले व रेव्ह. रंजन राठोड यांनी बिशपांना अधिकार पदाची अंगठी व पाळकीयकाठी प्रदान केली.
यावेळी मार्गदर्शन करताना बिशपांनी सेवेला आणि वक्तशीरपणाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला. सेवेसाठी पाचारण हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा समितीचा निर्णय नसतो तर तो दैवी निर्णय असतो, असे ते म्हणाले. धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेव्ह. एस.एस. खंडागळे, सचिव डॉ. लालबहादूर कांबळे, खजीनदार डॅनियल अस्वले, सदस्य रेव्ह. रंजन राठोड,रेव्ह.डायना गायकवाड, रेव्ह. आनंद खंडागळे, जेम्स अंबीलढगे, विवेक निर्मळ, राजेश निर्मळ,मंगलाबाई आर्सुड, वैभव उगले, बबीता घुले, अर्चना मोटे आणि स्वप्नील गुडेकर तसेच धर्मप्रांता अंतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सर्व आचार्य, विविध मंडळांच्या पास्टोरेट कमिटीचे पदाधिकारी, मिशनरी, विविध धार्मिक संस्था, महिला मंडळ, तरुण संघ, शाळा, शाबाथ शाळा आदींचे प्रमुख व पदाधिकारी यांच्यासह अनेक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
मराठवाडा धर्मग्रंथाचा इतिहास
उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळाच्या नाशिक धर्मप्रांताचे विभाजन करून २३ जानेवारी १९९९ रोजी मराठवाडा धर्मग्रंथाची स्थापना झाली होती. तत्पूर्वी तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १५० वर्षांपासून चर्च मिशनरी सोसायटी (सीएमएस) तर्फे जालना जिल्ह्यात जवळपास दीडशे वर्षापासून स्कॉटिश ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य चालू होते. १९७० ला वरील दोन्ही मंडळ एकत्रित आल्या होत्या.