विद्यापीठाची तब्बल १७५ एकर जमीन भाडेपट्ट्यावर; मात्र मिळते फक्त ११७ रुपये वार्षिक भाडे

By राम शिनगारे | Published: July 4, 2023 12:43 PM2023-07-04T12:43:11+5:302023-07-04T12:43:35+5:30

विद्यापीठाने शासनाच्या रेडिरेकनर दरानुसार संबंधित संस्थांना भाडे आकारल्यास विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो

As many as 175 acres of land of the Dr.BAMU on lease; But the annual rent is only Rs. 117 | विद्यापीठाची तब्बल १७५ एकर जमीन भाडेपट्ट्यावर; मात्र मिळते फक्त ११७ रुपये वार्षिक भाडे

विद्यापीठाची तब्बल १७५ एकर जमीन भाडेपट्ट्यावर; मात्र मिळते फक्त ११७ रुपये वार्षिक भाडे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मालकीच्या ७२५ एकर जमिनीपैकी विविध १४ संस्थांना तब्बल १७५ एकर ४ गुंठे जमीन भाडेपट्ट्यावर दिली आहे. या जमिनीचे विद्यापीठाला प्रतिएकर केवळ ११७ रुपये वार्षिक भाडे मिळते. भाडेपट्ट्यावर दिलेल्या १७५ एकर जमिनीला वार्षिक भाडे २० हजार ४०९ एवढे मिळत असल्याची माहिती समोर आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्वत:च्या मालकीची ७२५ एकर जमीन असणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या क्षेत्रफळावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्याचवेळी विद्यापीठाने विविध शासकीय संस्था, वसतिगृहांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन ३५, ६०, ९० आणि ९९ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिली आहे. यामध्ये राज्य पुरातत्त्व विभाग, सहसंचालक क्रीडा व युवक विभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, नायलेट संस्था, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ, जिल्हा सैनिक मुलांचे व मुलींचे वसतिगृह, महानगरपालिका पाण्याची टाकी, आदिवासी मुलाचे वसतिगृह, यशवंत वसतिगृह, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, स्पाेर्ट ॲथोरटी ऑफ इंडिया (साई) आणि शासकीय विज्ञान संस्थेचा समावेश आहे. या सर्व जमिनीच्या भाडेकरारातून विद्यापीठाला वर्षाअखेर २० हजार ४०९ रुपये मिळतात. त्यातील यशवंत वसतिगृहाचे भाडेच १२ हजार रुपये एवढे आहे.

...तर कोट्यवधींचे भाडे मिळेल
विद्यापीठाने शासनाच्या रेडिरेकनर दरानुसार संबंधित संस्थांना भाडे आकारल्यास विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असा दावा रिपाइंचे (आठवले गट) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात केला आहे. रेडिरेकनर दरानुसार महसूल संबंधित संस्थांकडून विद्यापीठाने वसूल केल्यास शासनाकडून अनुदानही घेण्याची गरज भासणार, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सर्वात जुना भाडेकरार यशवंत वसतिगृहाचा
विद्यापीठात प्रवेश करताच उजव्या हाताला यशवंत वसतिगृह आहे. या वसतिगृहासाठी १० एकर १ गुंठे जमीन देण्यात आलेली आहे. त्यासाठीचा करार हा २७ सप्टेंबर १९६८ साली केलेला आहे. त्यानंतर मनपा, साई, नायलेट, बँक ऑफ महाराष्ट्रासह इतर संस्थांचा नंबर लागतो. आदिवासी वसतिगृहासाठी सर्वात शेवटी म्हणजे २०१५ साली करार करण्यात आलेला आहे.

कोणत्या संस्थेला किती जमीन दिली भाडेपट्ट्याने
संस्था....................जमिनीचे क्षेत्रफळ.........वार्षिक भाडे......भाडेपट्टा

राज्य पुरातत्त्व विभाग (सोनेरी महल)........६ एकर ३ गुंठे.............०१ ..................६० वर्षे
सहसंचालक, क्रीडा व युवक विभाग.........४ एकर १४ गुंठे..........१०००...............६० वर्षे
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग.............१ एकर २० गुंठे...........०१....................९९ वर्षे
बँक ऑफ महाराष्ट्र.................................४ गुंठे.......................०१.....................९० वर्षे
नायलेट संस्था.......................................१८ एकर २१ गुंठे..........२०२.................९९ वर्षे
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ......................१ एकर १० गुंठे............१२००...............९९ वर्षे
जिल्हा सैनिक मुलांचे वसतिगृह..............२ एकर.....................५०००.................६० वर्षे
जिल्हा सैनिक मुलींचे वसतिगृह..............२ एकर....................१०००...................६० वर्षे
महापालिका पाण्याची टाकी..................४ गुंठे.......................०१.......................९९ वर्ष
आदिवासी मुलांचे वसतिगृह...................३ एकर....................०१........................९९ वर्षे
यशवंत वसतिगृह................................१० एकर १ गुंठे............१२०००.................९९ वर्षे
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.......२ एकर.......................०१.....................६० वर्षे
स्पाेर्ट ॲथोरटी ऑफ इंडिया (साई)..........९९ एकर ७ गुंठे.......०१......................९९ वर्षे
शासकीय विज्ञान संस्था..........................२५ एकर...................००.....................कायमस्वरूपी

Web Title: As many as 175 acres of land of the Dr.BAMU on lease; But the annual rent is only Rs. 117

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.