तब्बल २५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात पोलिस, डीआरआयची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 06:31 AM2023-10-23T06:31:42+5:302023-10-23T06:32:32+5:30

वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये छापा टाकला असून, तेथे अमली पदार्थ तयार करण्यासाठीचे २५० ते ३०० कोटींहून अधिक किमतीचे कच्चे रसायन असल्याचा अंदाज पथकाने व्यक्त केला.

as many as 250 crore drugs seized gujarat police dri strike action | तब्बल २५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात पोलिस, डीआरआयची धडक कारवाई

तब्बल २५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात पोलिस, डीआरआयची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क,  छत्रपती संभाजीनगर : शहरातील कांचनवाडीतील एका आलिशान बंगल्यातून व पैठण एमआयडीसीतील एका कंपनीतून गुजरात पोलिस, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकांनी तब्बल २५० कोटी रुपयांचे ४४ किलो कोकेन, मेफेड्रोन आणि केटामाइन, असा ड्रग्ज साठा पकडला. 

वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये छापा टाकला असून, तेथे अमली पदार्थ तयार करण्यासाठीचे २५० ते ३०० कोटींहून अधिक किमतीचे कच्चे रसायन असल्याचा अंदाज पथकाने व्यक्त केला. गुजरातेतून आलेले हे पथक गेले दोन दिवस (दि. २० व २१ ऑक्टोबर) अतिशय गोपनीय पद्धतीने शहरात छापे टाकत असताना शहर पोलिसांना त्याची किंचितही माहिती नव्हती. 

अहमदाबाद, मुंबई आणि पुणे येथील पथकांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्यानंतर दोन आरोपींना अटक केली आहे. त्यातील एका आरोपीने येथील जीएसटी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. आरोपींत जितेशकुमार हिन्होरिया प्रेमजीभाई उर्फ पटेल (४४, कांचनवाडी) व संदीप शंकर कमावत (४०, रा. वाळूज) यांचा समावेश आहे.

२५० ते ३०० कोटींचे कच्चे रसायन

छाप्यात २५० कोटी रुपयांचे ४४ किलो अमली पदार्थ पकडण्यात आले आहे. पैठण आणि वाळूज एमआयडीसीत २५० ते ३०० कोटींहून अधिक किमतीचे कच्चे रसायनही आढळले आहे. ते अद्यापही रेकॉर्डवर घेण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एका आरोपीने गळा चिरला, नस कापली

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सिडकोतील जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या कार्यालयात आणले. तेथे आरोपीने अधिकाऱ्यांची नजर चुकवून काचेच्या तुकड्याने गळा व हाताच्या नसा कापल्या. यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतरच बातमी बाहेर आली आहे. तोपर्यंत गेेले दोन दिवस शहर पोलिसांना या छाप्याचा काहीच थांगपत्ता नव्हता.

एकाला पोलिस कोठडी

अमली पदार्थाच्या प्रकरणातील दुसरा आरोपी संदीप शंकर कमावत याला डीआरआयच्या पथकाने रविवारी (दि. २२) येथील जेएमएफसी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि. २३) एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.


 

Web Title: as many as 250 crore drugs seized gujarat police dri strike action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.