छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 17, 2024 03:30 PM2024-07-17T15:30:05+5:302024-07-17T15:30:55+5:30
याशिवाय अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विठ्ठल मूर्तीचे स्थान आहे.
छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशी म्हटले की, भाविक सोलापूर जिल्ह्यातील मोठे पंढरपूर असो की, शहराजवळील छोटे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात. अहो, आपल्या शहरातही एक किंवा दोन नव्हे, तर तब्बल विठ्ठल-रुक्मिणीची तब्बल ५६; तीही स्वतंत्र मंदिरे आहेत. याशिवाय अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विठ्ठल मूर्तीचे स्थान आहे. ही सर्व मंदिरे शहर व परिसरात आहेत.
सर्वात जुने मंदिर धावणी मोहल्ल्यात
विठ्ठल रुक्मिणीचे शहरातील सर्वात जुने मंदिर कोणते, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. शहागंज गांधी पुतळा चौकाजवळील धावणी मोहल्ल्यात ३५० वर्षांपूर्वीचे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. गाभाऱ्यात एक नव्हे, तर विठ्ठल रुक्मिणीच्या दोन मूर्ती आहेत. यातील एक उत्सव मूर्ती आहे. वर्षातून एकदाच आषाढी एकादशीच्या दिवशी उत्सव मूर्तीला मंदिरातून बाहेर नगर प्रदक्षिणेसाठी नेले जाते.
सर्वात नवीन मंदिर सुधाकर नगरात
विठ्ठल रुक्मिणीचे सर्वात नवीन मंदिर सातारा परिसरातील सुधाकर नगराच्या अलीकडे डोंगराच्या पायथ्याशी आहे. हिमालयेश्वर महादेव मंदिर परिसरात नवीन मंदिर उभारले आहे. राजस्थानमधील जयपूर येथून ४ फूट उंचीच्या मूर्ती आणल्या आहेत. काळ्या पाषाणातील या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ या दिवशी करण्यात आली.
विठ्ठल रुक्मिणीसोबत राई असलेले शहरातील एकमेव मंदिर
शहरातील प्रत्येक भागात, गल्लीमध्येही विठ्ठल रुक्मिणीची मंदिरे आहेत. पण, फक्त एक मंदिर असे आहे की, तिथे भगवान विठ्ठल व रुक्मिणीसोबत राईचे पण दर्शन होते. ते मंदिर म्हणजे जयसिंगपुरात राजस्थान सरकार देवस्थान विभागातर्फे बांधलेले एकमेव मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी राईसोबत अन्य देव-देवतांच्या मूर्ती येथे आहेत. विठ्ठलाच्या आरतीत ‘रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा’ असा उल्लेख येतो. त्या राईचे दर्शन येथे होते.
- प्रा. अनिल मुंगीकर, मंदिरांचे अभ्यासक.