पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगरात तब्बल ७०० अंगणवाड्या उघड्यावर
By विजय सरवदे | Published: June 27, 2024 06:03 PM2024-06-27T18:03:53+5:302024-06-27T18:04:03+5:30
गेल्या आर्थिक वर्षात फक्त ४५ इमारतीसाठीच प्रशासकीय मान्यता
छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या जिल्ह्यात जवळपास ७०० अंगणवाड्यांचा कारभार उघड्यावरच चालत असून ही गोष्ट या जिल्ह्यासाठी फारसी भूषणावह नाही, अशी चिंता या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाने तरतूदच बंद केली आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या ३ टक्क्यांपैकी १ टक्का निधीतून गेल्या आर्थिक वर्षात जि. प. प्रशासनाने ४५ अंगणवाडी इमारतींना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या आर्थिक वर्षात तर अजून तरतूदच मंजूर नाही. त्यामुळे उघड्यावर चालणाऱ्या अंगणवाड्यांचे इमारतींचे स्वप्न कधी पूर्ण होईल, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
जिल्ह्यात साडेतीन हजार अंगणवाड्या असून, यापैकी स्वत:ची इमारत नसलेल्या ७०० अंगणवाड्यांचे कामकाज समाजमंदिरे, शाळा खोल्या, भाड्याच्या खोलीत, तर काही समुदाय पंचायत कार्यालयांत चालते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालके, स्तनदा माता, गरोदर मातांना पोषण आहार, लसीकरणाची सुविधा दिली जाते. कुपोषण निर्मूलन, तसेच बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणही अंगणवाड्यांच्या माध्यमातूनच दिले जाते. पूर्वी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती, पण मागील तीन वर्षांपासून बांधकामाचे लेखाशीर्षच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारतींचे बांधकाम लटकले आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत महिला व बालविकास विभागासाठी ३ टक्के निधीची तरतूद केली जाते. या निधीतून राज्य सरकारचा जिल्हा महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जि.प.चा महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येकी १ टक्का निधी मिळतो. त्यानुसार जि.प.च्या वाट्याला येणाऱ्या ५ कोटी १५ लाखांच्या निधीतून जवळपास ४५ अंगणवाडी इमारत बांधकामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
विशेष म्हणजे, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीत जि. प.च्या वतीने ७२३ अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ८३.६४ कोटी आणि ११२० अंगणवाड्यांमध्ये वीज जोडणीसाठी ९.८५ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्यावर अजूनही निर्णयच झालेला नाही.
अंगणवाडी इमारतींची सद्य:स्थिती
तालुका- एकूण अंगणवाड्या- इमारत नसलेल्या
छत्रपती संभाजीनगर- ४७४- ९६
फुलंब्री- २७४- ६३
सिल्लोड- ४९३- ९६
सोयगाव- १५०- २४
कन्नड- ५२३- ८८
खुलताबाद- १७३- ३३
गंगापूर- ४८४- १४६
वैजापूर- ३९१- ९८
पैठण- ४६२- ८१