अमित शाह यांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील नेते उद्धवसेनेत
By संतोष हिरेमठ | Updated: September 25, 2024 14:49 IST2024-09-25T14:45:12+5:302024-09-25T14:49:27+5:30
वैजापूर, गंगापूर मधील भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आदींच्या हाती शिवबंधन

अमित शाह यांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील नेते उद्धवसेनेत
छत्रपती संभाजीनगर : वैजापूरचे भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उध्दवसेनेत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर मधील दौरा आटोपताच भाजपला हा धक्का बसला.
भाजपचे नेते दिनेश परदेशी यांच्यासोबत वैजापूर, गंगापूर मधील नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विविध संघटनेचे नेते यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे हे गत आठवड्यात छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात आले होते. याच दौऱ्यात त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र तेव्हा त्यांचा प्रवेश झाला नव्हता. अखेर त्यांनी आज मुंबईत जाऊन उद्धवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दाखविलेला विश्वास पुढील काळात मी स्वार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार असून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा येथे फडकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, यावेळी डॉ. परदेशी यांनी यावेळी दिली.