इथेनॉल उत्पादनावर बंदी आणताच साखरेचा गोडवा वाढला
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 11, 2023 15:12 IST2023-12-11T15:11:52+5:302023-12-11T15:12:34+5:30
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याने साखर उद्योगच नव्हे तर व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला.

इथेनॉल उत्पादनावर बंदी आणताच साखरेचा गोडवा वाढला
छत्रपती संभाजीनगर : देशात यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे तुटवडा जाणवून साखरेचे भाव क्विंटलमागे तब्बल ४१२० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी आणली तसेच निर्यातीवरही बंदी आणल्याने त्याचा त्वरित परिणाम, स्थानिक बाजारपेठेवर दिसून आला. १०० रुपयांनी भाव कमी होऊन शनिवारी ४००० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली गेली. किलोमागे १ रुपयाने साखर स्वस्त झाल्याने गोडवा वाढला आहे.
उसाच्या कमतरतेमुळे जानेवारी महिन्यात साखर कारखाने बंद होतील व क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची तेजी येईल, असे अनेक साखर उद्योग व व्यापाऱ्यांना अंदाज होता. यामुळे साखरेचा बाजारात मोठा साठा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याने साखर उद्योगच नव्हे तर व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. साखरेचे भाव वाढत ३९५० ते ४१२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले. साखर कारखाने व डिस्टिलरी साखरेच्या रसापासून इथेनॉल तयार करीत होत्या. केंद्र सरकारने या उत्पादनावरच बंदी आणली. यामुळे शनिवारी साखरेचे भाव कमी होऊन ३८५० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आले. तर किरकोळ विक्रीत साखर १ रुपयाने कमी हे दर ४० ते ४१ रुपये प्रतिकिलो असे आहे.
निवडणुकीत महागाईचा मुद्दा नको
२०२४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकीत महागाईचा मुद्दा अडसर ठरू शकतो. यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याची चर्चा जुन्या मोंढ्यात व्यापाऱ्यांमध्ये होती. कारण, मॉल, बडे व्यापाऱ्यांकडे जास्त भावातील साखरेचा मुबलक साठा शिल्लक आहे. भाव किलोमागे १ रुपयाने कमी झाले असले तरी व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
साखर उत्पादन वाढणार
दरवर्षी साखर कारखाने एप्रिलपर्यंत सुरू राहतात. पण यंदा उसाच्या तुटवड्यामुळे जानेवारीच्या अखेरीस बंद होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने साखर कारखाने आता साखर उत्पादनावर लक्ष देतील व साखर उत्पादन वाढेल. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १७२.२३ लाख क्विंटलपर्यंत होऊ शकते. यामुळे तेजीची शक्यता कमी आहे.
- राजेश कासलीवाल, घाऊक व्यापारी
साखरेची किंमत:
साखर ४ डिसेंबर ९ डिसेंबर
क्विंटल ३९५०-४१५० रु ३८५०-४००० रु.
किलो ४१-४२ रु ४०-४१ रु.