मोफत म्हणताच कोरोनाच्या बूस्टर डोसवर उड्या ! दोन दिवसांत 3 हजार ४४२ जणांनी घेतली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:13 PM2022-07-18T12:13:11+5:302022-07-18T12:14:51+5:30
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. १५ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वांनाच मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसचा तिसरा अर्थातच बूस्टर डोस १८ ते ५९ वयोगटांसाठी सशुल्क केल्याने त्यास मिळणारा प्रतिसाद घटला होता. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागतात केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. ३० सप्टेंबर २०२२पर्यंत कोरोना प्रतिबंध बूस्टर डोस नागरिकांना मोफत केला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून महापालिकेने मोफत बूस्टर डोस सुरू केला. दोनच दिवसांत ३,४४२ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या विविध भागांत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतही कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी चिंता वाढवत आहे. औरंगाबाद शहर पॉझिटिव्हिटी रेटमध्ये राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांचा लसीकरणालादेखील प्रतिसाद वाढताना दिसत आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसचा बूस्टर डोस हा सशुल्क करण्यात आला होता.
कोरोना संसर्गाची साथ कमी करण्यासाठी पहिला, दुसरा व त्यानंतर बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, वृद्धांनाच मोफत दिला जात होता. १८ वर्षांवरील नागरिकांना हा डोस खासगी रुग्णालयात विकत घ्यावा लागत होता. मात्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. १५ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वांनाच मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने शहरातील ४८ लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरण सुरू केले. शुक्रवारी १,३५८, शनिवारी २,०८४ जणांनी डोस घेतल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.