पिकांना पाणीदेण्यासाठी विद्युतपंपाचे बटन दाबताच शेतकरी पुत्राची तुटली आयुष्याची दोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 07:07 PM2023-01-19T19:07:13+5:302023-01-19T19:07:39+5:30
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याच्या एकुलत्या एक पुत्राचा मृत्यू : कन्नड तालुक्यातील सायगव्हाण येथील घटना
नागद (औरंगाबाद) : पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकरी पुत्राचा बटन दाबताच विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना कन्नड तालुक्यातील सायगव्हाण येथे बुधवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली. चेतन मच्छिंद्र सौंदाणे (वय १९) असे मयताचे नाव आहे.
सायगव्हाण येथील शेतकरी मच्छिंद्र सौंदाणे यांचा मुलगा चेतन हा बुधवारी टोमॅटोच्या पिकाला पाणी देण्यासाठी दुपारी दीड वाजेदरम्यान विहिरीवर विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेला. यावेळी विद्युत पंपाच्या स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. ही बाब माहिती नसलेल्या चेतनने बटन दाबताच जोराचा विजेचा धक्का बसून तो जागीच कोळसला. बाजूच्या शेतातील भीमराव मोरे व वत्सलाबाई मोरे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ओरडून चेतनचे वडील व काकाला माहिती दिली. त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी धाव घेत त्याला तत्काळ नागद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. डॉ. लोखंडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी नागद पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. तपास पोहे अजय मोतिंगे, लक्ष्मण गवळी, पोना सुशीलकुमार बागूल करीत आहेत.
एकुलता एक मुलगा गेला
मच्छिंद्र सौंदाणे यांना चेतन हा एकुलता एक मुलगा व एक मुलगी, असे दोन अपत्य आहेत. चेतन हा चाळीसगाव (जि. जळगाव) येथील राष्ट्रीय महाविद्यालयात बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो गावातून महाविद्यालयात ये-जा करायचा. सध्या रब्बी पिकांना पाणी देणे सुरू असल्याने बुधवारी वडिलांना शेतात मदत करण्यासाठी तो थांबला होता. यातच विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने सौंदाणे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. चेतनच्या पश्चात आई-वडील, बहीण, काका असा परिवार आहे.