कचरा डेपो हटताच नारेगावची भरारी; लघु उद्योजक, व्यावसायिकांमुळे परिसरात सुबत्ता
By साहेबराव हिवराळे | Published: June 13, 2023 08:27 PM2023-06-13T20:27:17+5:302023-06-13T20:27:39+5:30
आर्थिक वजन वाढल्याने नारेगावच्या कक्षा रुंदावल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी नारेगावला जायचे म्हटले की, नको रे बाबा, अशी सामान्यांची प्रतिक्रिया असे. कचरा डेपोमुळे असह्य दुर्गंधीने रोगराई पसरली होती. पण डेपो बंद झाला अन् टोलेजंग इमारती उभा राहिल्या. लघु उद्योजक तसेच व्यावसायिकतेमुळे नारेगावाच्या आर्थिक प्रतिष्ठेत भर पडली असून, बेरोजगारांच्या हाताला काम मिळाल्याने होलसेलपासून ते किरकोळ वस्तूंसाठी शहरात जाण्याची आता गरज राहिलेली नाही.
बांधकाम साहित्य, फळाची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच फर्निचरचे तर हबच तयार झाले आहे. इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळा असून, विद्यार्थी संख्याही चांगली आहे. येथील नागरिकांच्या शेतजमिनी त्यावेळी चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात गेल्या. त्यांनी इतरत्र जमिनी घेतल्या तर काहींनी उद्योग व्यवसाय सुरू केले. कारखान्यात कामगार म्हणून अनेकजण निवृत्त झाले. विविध जोडधंद्यांतही अनेक युवकांनी जम बसविला आहे. आर्थिक सेवा देणाऱ्या बँकांची सेवा केंद्रे किमान दहा ठिकाणी आहेत. अशा गोष्टींनी रोजगाराला हातभारच लागत आहे.
लघु उद्योजक व व्यावसायिकांमुळे नारेगावात सुबत्ता
मनपाच्या कचरा डेपोला हटविण्यासाठी नारेगाव व परिसरातील पळशी, गोपाळपूर, महाल पिंप्री, वरूड, वरझडी, वडखा इ. भागांतील शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवले अन् त्यास यश मिळाले. त्याच दरम्यान, शहरातील विकासकामांत अडथळे ठरणाऱ्या वसाहतीतील घरे हटविण्यात आली अन् त्यांनी अगदी कमी किमतीत जागा खरेदी करून येथे निवास आणि व्यवसाय उभारले. त्यामुळे नारेगाव ही एक स्वतंत्र बाजारपेठ बनली आहे.
पाण्याच्या टाकीचे काम जोरात
येथील नागरिकांना सातत्याने बोअरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. मोजक्या भागांत महानगरपालिकेचे पाणी मिळते. पण, बहुतांश नागरिकांना जारच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते.
पाणी समस्या दूर होणार
१६८० कोटी रुपयांतून नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू आहे. शाळेतील गुणवत्ता पाहता उच्च पदावर जाण्याचे स्वप्न येथील मुलांनी बाळगले आहे.
- माजी नगरसेवक गोकुळ मलके
नारेगावचे पाऊल पडते पुढे...
औद्योगिक क्षेत्राच्या कुशीत नारेगाव असल्याने मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांना सेवा सुविधा देण्यासाठी मनपा, तसेच लोकप्रतिनिधींनी विकासकामांसाठी मदत केलेली आहे. रस्ते, समाज मंदिर, उद्यान, आरोग्य केंद्र असून, भविष्याच्या दृष्टीने युवकांचे पाऊल पुढे पडत आहे.
- माजी नगरसेवक भगवान रगडे
रोजगार मेळावे आयोजित करावेत...
शासनाच्या माध्यमातून आपल्या आवड-निवडीचे क्षेत्र लक्षात घेऊन येथे रोजगार मेळावे घेऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात त्याचा फायदा होईल.
- अंकुश दानवे
नारेगावच्या कक्षा रुंदावल्या...
नारेगाव पूर्वी शेतीवर अवलंबून होते. परंतु, आता सिमेंटच्या उंच इमारती उभा राहिलेल्या आहेत. आर्थिक वजन वाढल्याने नारेगावच्या कक्षा रुंदावल्या आहेत.
- कौतिकराव तवले
चेहरामोहरा बदलला
घरासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्यासह फर्निचर, लोखंड, सिमेंट आणि प्रशिक्षित बांधकाम व्यावसायिकांनी नारेगावचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. हॉटेल व मंगल कार्यालयापासून येथे सर्व काही मिळत आहे. शहरातील व्यावसायिकही नारेगावात येत आहेत.
- कादर शहा