पेपरवर ‘मार्क’ करताच छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओत वाहनाचे काम ‘फास्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:51 PM2024-08-01T15:51:01+5:302024-08-01T15:59:19+5:30
सर्वसामान्य वाहनधारकांचे रेंगाळते काम, छत्रपती संभाजीनगर आरटीओतील प्रकार
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात कागदपत्रांवर काही ठराविक निशाणी केली की, वाहनासंबंधी काम एकदम ‘फास्ट’ होत असल्याचा अनुभव वाहनधारकांना येत आहे. पण, निशाणी कोणीही मारू शकत नाही. त्यासाठी काही खास व्यक्ती आरटीओ कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना काही रक्कम मोजली की, पेपरवर ठरावीक ‘मार्क’ मिळतो आणि लगेच काम फत्ते होऊन जाते.
आरटीओ कार्यालयातील अनेक कामकाज ऑनलाइन झाल्याने वाहनधारकांना अगदी घरबसल्या कामकाज करता येते. मात्र, वाहनांसंबंधी अनेक कामांसाठी आजही आरटीओ कार्यालय गाठावेच लागते. आरटीओ कार्यालयात एकदा गेले आणि काम झाले, असा अनुभव क्वचितच कोणाला येतो. एखाद्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यातच आरटीओ कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी नाही. पूर्णवेळ अधिकारी मिळूनही गेल्या दीड महिन्यापासून ते रुजू झालेले नाहीत. या परिस्थितीत आरटीओतील कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यातूनच वाहनधारकांना फटका बसत आहे. अशातच आरटीओत काहींना पैसे मोजल्यानंतर कागदपत्रांवर एखादी निशाणी मारली जाते आणि निशाणी मारलेली ही कागदपत्रे जमा केली की, काम पूर्ण होऊन जात असल्याचा प्रकार सध्या आरटीओ कार्यालयात चर्चेत आहे.
निशाणी नसलेल्या कागदपत्रांत त्रुटी
ज्या कागदपत्रांवर निशाणी नसेल, त्यात अनेक त्रुटी काढण्याचा प्रकार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही निशाणीची सोय खासकरून एजंट्ससाठी असल्याचे सांगण्यात आले.