रेल्वे रद्द होताच औरंगाबादहून मुंबईसाठी ट्रॅव्हल्सचे भाडे झाले विमान तिकिटाच्या निम्मे
By संतोष हिरेमठ | Published: November 18, 2022 12:34 PM2022-11-18T12:34:52+5:302022-11-18T12:37:30+5:30
प्रवाशांच्या खिशाला कात्री : १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान मुंबईचा प्रवास झाला महाग
औरंगाबाद : मध्य रेल्वेतील लाइन ब्लाॅकमुळे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान नांदेड आणि मुंबईकडे जाणाऱ्या १२ रेल्वे रद्द झाल्या आहेत. रेल्वे रद्द होताच नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्सचालकांनी या तीन दिवसांत मुंबईच्या ट्रॅव्हल्सच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे. १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद-मुंबई विमानाचा तिकीट दर ३ हजार ५६३ रुपये आहे. त्याच्या निम्मी रक्कम ट्रॅव्हल्सने मुंबई गाठताना प्रवाशांना मोजावी लागत आहे.
मुंबई आणि नांदेडला १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान रेल्वेने प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना आता विमान, ट्रॅव्हल्स, एसटी बसने प्रवास करावा लागणार आहे. काहींनी खासगी वाहनाने मुंबई गाठण्याची तयारीही केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांची संख्या वाढल्याची संधी साधत अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. ज्या ट्रॅव्हल्सचे भाडे १८ नोव्हेंबर रोजी १ हजार ९० रुपये, त्याच ट्रॅव्हल्स कंपनीने १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान १ हजार २६० ते १ हजार ४६० रुपयांपर्यंत भाडे वाढविले आहे. अशीच भाडेवाढ इतर ट्रॅव्हल्सने या तीन दिवसांदरम्यान केली आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.
कोणत्या रेल्वे रद्द?
१९ नोव्हेंबर रोजी मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, २० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच २० नोव्हेंबर रोजी मुंबईहून धावणारी तपोवन एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी तपोवन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
मुंबईच्या हवाई प्रवासाचे दर
औरंगाबाद मुंबईला जाण्यासाठी आजघडीला दोन विमाने उपलब्ध आहेत. १९ नोव्हेंबर रोजी एका विमानाचा तिकीट दर ३ हजार ५६३ आणि दुसऱ्या विमानाचा दर ७ हजार ३४३ रुपये आहे. रविवारी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी एकच विमान उपलब्ध आहे. या दिवशी मुंबईच्या विमान प्रवासासाठी तब्बल ११ हजार ५४३ रुपये मोजावे लागणार आहेत.
एसटी सोडणार जादा बस
रेल्वे रद्द असल्याच्या कालावधीत नांदेड आणि मुंबईसाठी एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार या बस सोडण्यात येतील, असे विभाग नियंत्रक अमोल अहिरे यांनी सांगितले.
शहरातून मुंबईसाठी धावणाऱ्या ट्रॅव्हल्स : ४८
मुंबईचे ट्रॅव्हल्सचे भाडेदर
तारीख - भाडे
१८ नोव्हेंबर : ७०० ते १२९०
१९ नोव्हेबर : १,२६० ते २,०६०
२० नोव्हेंबर : १,५०० ते २,२००
२१ नोव्हेंबर : १,०६० ते १,७१०
(भाडे रुपयांमध्ये)