बसमध्ये जागा नाही म्हणताच प्रवाशाची महिला वाहकास शिवागाळ, शर्ट पकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 07:07 PM2024-07-09T19:07:53+5:302024-07-09T19:10:23+5:30
बस जाळून टाकण्याची धमकी देत प्रवाशी बसस्थानकातून निघून गेला
- अनिलकुमार मेहेत्रे
पाचोड ( छत्रपती संभाजीनगर): पाचोड बसस्थानकावर आलेल्या आंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये न घेतल्याने संतापलेल्या प्रवाशाने महिला वाहकाला मारहाण केल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला वाहकाच्या फिर्यादीवरून पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला वाहक सविता आदिनाथ तोंडे ( ३४) यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पाचोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर बस ( एमएच २० बीएल २८०४) आज सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास पाचोडबस स्थानकात आली. चहापाणी घेतल्यानंतर ही बस सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पाचोड बस स्थानकामधून निघाली. याचवेळी एक प्रवासी बसमध्ये चढला. त्यास महिला वाहक तोंडे यांनी गाडीत बसण्यासाठी जागा नाही खाली उतरा, असे सांगितले. मात्र, या प्रवाशाने शिवीगाळ करत महिला वाहक तोंडे यांना शर्टच्या कॉलरला पकडून खाली ओढत मारहाण केली. तसेच त्या प्रवाशाने बस पेटवून देईल अशी धमकी देत तेथून निघून गेला. फेरीवाल्यांनी त्याचे नाव अमोल डुकळे ( रा.पाचोड) असे सांगितले.
दरम्यान, महिला वाहक तोंडे यांनी पाचोड बसस्थानकमधील वाहतूक नियंत्रक पठाडे यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर पठाडे यांनी महिला वाहक तोंडे व चालकास घेऊन थेट पाचोड पोलीस स्टेशन गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या आदेशाने घटनेचा पंचनामा करण्यात आला. तसेच महिला वाहक सविता तोंडे यांच्या फिर्यादीवरून अमोल डुकळे याच्या विरोधात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.