आरोप सिद्ध न झाल्याने हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या चौघांची मुक्तता, खंडपीठातही निकाल कायम
By प्रभुदास पाटोळे | Published: February 20, 2024 02:54 PM2024-02-20T14:54:56+5:302024-02-20T14:55:30+5:30
बीड जिल्ह्यातील प्रकरण; सरकार पक्षाचा पुरावा कमकुवत व तकलादू
छत्रपती संभाजीनगर : आरोप सिद्ध न झाल्यामुळे पतीसह सासरच्या चौघांची हुंडाबळीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करणारा सत्र न्यायालयाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे यांनी कायम करीत सरकार पक्षाचे अपील फेटाळले.
हुंड्याचे उर्वरित एक हजार रुपये आणि शेती खरेदी करण्यासाठी २० हजार रुपये विवाहितेने माहेरहून आणले नसल्यामुळे शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सासरच्या लोकांवर आरोप होता. रेकॉर्डवरील पुरावा, साक्षीदारांचे जबाब आणि मृत्यूपूर्व जबाबाचे अवलोकन केले असता विवाहितेने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे निष्पन्न होते. आरोपींनी छळ केल्याबाबतचा पुरावा कमकुवत आणि तकलादू असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील बरगवाडी येथील मंदाबाई शिवाजी गुजर हिने १६ जानेवारी १९९८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. पती शिवाजी, दीर अशोक, सासरा सर्जेराव आणि सासू कांताबाई हे हुंड्याचे उर्वरित एक हजार रुपये आणि शेती खरेदी करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करीत छळ करीत होते, असा मंदाबाईचा मृत्यूपूर्व जबाब होता. उपचारादरम्यान १९ जानेवारी १९९८ ला मंदाबाईचा मृत्यू झाला. बीडच्या सत्र न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला शासनाद्वारे खंडपीठात आव्हान देण्यात आले. आरोपींतर्फे ॲड. राजेंद्र हंगे यांनी काम पाहिले.
एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालविणे अयोग्य
एखाद्या आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालवून त्याला एकापेक्षा जादा वेळा शिक्षा ठोठावणे (डबल जिओपार्डी) कायद्याला अपेक्षित नाही. मात्र, प्रस्तुत प्रकरणातील पती शिवाजीविरुद्ध १९९५ साली भादंवि कलम ४९८-अ नुसार खटला दाखल झाला होता. पती-पत्नीमध्ये तडजोड होऊन पत्नी पुन्हा नांदावयास आली होती, याकडे ॲड. हंगे यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.