थंडी वाढताच वाढला महागड्या मोहरी, तीळ तेलाचा मसाजसाठी वापर; काय आहेत वैशिष्ट्य?
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 28, 2023 01:36 PM2023-12-28T13:36:34+5:302023-12-28T13:37:46+5:30
महागड्या मोहरी, तीळ तेलाचा शहरवासीय करतात वापर
छत्रपती संभाजीनगर : एरव्ही महाग-महाग म्हणून खरेदी न करणारे शहरवासीय आता थंडी वाढताच मोहरी (सरसो) व तीळ तेलाने मसाज करत आहेत. डोक्यापासून ते तळपायापर्यंत हे महागडे तेल लावून मसाज करीत आहेत. कारण, आरोग्याविषयी वाढलेली जागरुकता होय. थोडे जास्त रुपये खर्च झाले तरी चालेल; पण आपली त्वचा ही मुलायम राहावी हीच तर त्यांची भावना आहे.
परप्रांतीयांमुळे महिन्याला टन भर विकतेय तेल
शहरात सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा असो वा करडई तेल यांचा वापर खाण्यासाठी करीत असतात. आपल्याकडे मोहरी व तिळाच्या तेलाची फोडणी दिली जात नाही. मात्र, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा या राज्यांत मोहरीच्या तेलाचा सर्वाधिक खप आहे. आपल्या शहरात नोकरी-उद्योगधंद्याच्या निमित्ताने परप्रांतीय मोठ्या संख्येने राहण्यास आले आहेत. या परप्रांतीयांच्या मागणीमुळे शहरात महिन्याकाठी १ टनापेक्षा अधिक मोहरी व तीळ तेल विकले जाते. थंडीच्या दिवसात मोहरी व तीळ तेलाची विक्री २५ ते ३० टक्क्यांनी वाढते.
- जगन्नाथ बसैये, व्यापारी
तेलाचे काय भाव ?
प्रकार किंमत (प्रति लिटर)
मोहरी तेल १६० रु
तीळ तेल २०० रु
मसाजसाठी मोहरीचे तेलच का ?
मोहरीचे तेल केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांच्या देखभालीसाठीही पोषक आहे. चेहरा निस्तेज किंवा त्वचा कोरडी दिसत असेल तर हे तेल त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरू शकते. मोहरीच्या तेलामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. मजबूत केसांसाठी तेलाचा वापर केला जातो. यात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अन्य पोषक घटक असतात.
तीळ तेलाचे फायदे
तीळ तेलात मिनरल्स, ओमेगा फॅटी ॲसिड अशी शरीराला उपयोगी ठरणारी पोषणद्रव्ये आढळतात. तिळाच्या तेलाच्या सेवनाने रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते व आवश्यक कोलेस्टेरॉल वाढते, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. थंडीत मसाजसाठी तीळ तेलाचा वापर केला जातो.